

मे महिना म्हंटल की लग्न सराईची धामधूम. या धामधुमीत अनेक लग्न सोहळे चर्चेत आले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातसुद्धा असाच एक लग्न सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे.


नवरी मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नाचं व्हराड चक्क बैलगाड्यांमधून नेलं आणि अनेकांच्या तोंडाचा चंबू झाल्याचं पाहायला मिळालं.


लग्नसराईत आपलं लग्न खूप चांगलं, नियोजनपूर्ण, विनाविघ्न पार पडावं आणि आयुष्यभर सर्वांच्या लक्षात राहावं अशी प्रत्येक मुलीच्या वडिलांची इच्छा असते. त्यासाठी मग प्रत्येकजण लग्नात वेगवेगळ्या युक्त्या लढवत असताना पाहायला मिळतो.


कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावातसुद्धा असंच एक लग्न चांगलंच चर्चेत आलं आहे. जुन्या आणि पारंपरिक पद्धतीनं नवरी मुलीच्या वडिलांनी वऱ्हाड चक्क बैलगाड्यांमधून नेलं.


कोलोली गावातील मारुती श्रीपती जाधव यांची एकुलती एक मुलगी तृप्ती जाधव हिचं लग्न आयुष्यभर लक्षात राहावं म्हणून त्यांना काहीतरी वेगळं करायची इच्छा होती.


मुलीचं लग्न कोलोलीतीलच विजय पांडुरंग पाटील या मुलाशी होणार होतं. त्यामुळे मुलीकडच्या वऱ्हाडाला कसं घेऊन जायचं हा विचार त्यांच्या मनात होता.


मुळात शेतकरी असल्यानं व्हराड बैलगाडीतूनच घेऊन जायचं त्यांनी ठरवलं. वडिलांनी गावातील 30हुन अधिक बैलगाडींचं बुकिंग करून त्या बैलगाड्या आकर्षक सजवल्या.


मुलीला घोड्यावर बसवून अगदी दिमाखात लग्नाचं वऱ्हाड नेलं. विशेष म्हणजे नेहमी शेतातल्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांना बैलपोळा सोडला तर कधी कोणी सजवलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही.


पण लग्नाचं वऱ्हाड न्यायचं म्हटल्यावर बैलगाड्यांच्या मालकांनीही खुश होऊन गुलाबी फेटे बांधले होते.