

कोरोनामुळे सगळ्यांची ताटातूट झाली आहे. अजुनही विनापरवाना प्रवासाची परवानगी नाही. त्यामुळे महाराष्ट्राला लागून असलेल्या तेलंगणा सीमेवर अनोखं रक्षाबंधन साजरं झालं.


लॉकडाऊन असल्याने गडचिरोली जिल्हयात महाराष्ट्र आणि तेलंगणाचा सीमावर्ती भाग बंद करण्यात आला आहे. तेलागंणाची आणि महाराष्ट्राची सीमा चार महिन्यांपासून बंद आहे.


दोनही राज्यांच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये लोकांचं कायम येणं जाणं असतं. लॉकडाऊनमुळे इथले सगळेच व्यवहारच बंद झाले आहेत.


रक्षाबंधन असतांनाही प्रवासाची परवानगी मिळाली नसल्याने तेलंगणा राज्यातील मंचिरियाल जिल्ह्यातला भाऊ राखी बांधायला महाराष्ट्रातील बहीणीकडे यायला निघाला. पण लाकडाऊनमुळे त्याला महाराष्ट्रात प्रवेश मिळाला नाही.


त्यामुळे भावाने महाराष्ट्रातल्या आपल्या लाडक्या बहीणीला तपासणी नाक्यावरच बोलावून घेतलं. बहीणीने तेलंगणातून आलेल्या भावाला पोलिसांच्या साक्षीने राखी बांधुन रक्षाबंधनाचा सण साजरा केला.