

कासवांना आश्रय देणारं गाव, टर्टल फेस्टिवलला फुलून जाणारं गाव निसर्ग वादळाच्या तडाख्याने कसं उद्ध्वस्त झालंय ते पाहून अंगावर काटा येईल.


वेळास हे रत्नागिरी जिल्ह्यातलं गाव कासव संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. गावकऱ्यांनी संस्थांच्या मदतीने इथे दुर्मीळ प्रजातीच्या कासवांना हक्काचं घर मिळवून दिलं आहे. आता मात्र गावकऱ्यांच्याच डोक्यावरचं छप्पर वादळाने हिरावून नेलं.


ऑलिव रिडले जातीच्या समुद्री कासवांची संख्या काही वर्षांपूर्वी कमी झाली होती. या कासवांची अंडी चोरून नेण्यात येत.


वेळास गावच्या गावकऱ्यांनी कासव मादीने अंडी घातली की त्याचं संवर्धन करण्यात पुढाकार घेतला. त्यामुळे वेळास गावाला कासवांचं गाव अशी ओळख मिळाली.


रत्नागिरीचा श्रीवर्धन तालुका निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात आला. वाऱ्याने गावाची ही अवस्था करून टाकली आहे.


वादळाची पूर्वकल्पना आल्याने गावकरी सुरक्षित स्थळी निवाऱ्यासाठी गेले होते. पण आयुष्यभराची पुंजी असलेलं घरच या वादळाने उडवून लावल्यामुळे प्रचंड आर्थिक आणि मानसिक धक्का गावकऱ्यांना बसला आहे.


गावातली कच्ची घरंच नव्हे तर पक्कं बांधकाम, पत्रे, कौलं वादळाने उडवून लावले. नारळी-पोफळी बागांचं तर अस्तित्वच नष्ट झालं आहे.


कासव अंड्यातून बाहेर पडून समुद्राच्या दिशेने जाण्यासाठी सक्षम होतात त्याच वेळी या कासव महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यावेळी कासवांना समुद्रात सोडण्याची संपूर्ण प्रकिया पर्यटकांना पाहायला मिळते. यंदा हे मोडलेलं गावच उभं राहण्याच्या प्रतीक्षेत आहे.


निसर्ग चक्रीवादळाने कोकणातल्या काही जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला आहे. रायगडआणि रत्नागिरीतल्या काही तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला.


दोपोली तालुक्यात मुरूड, वेळास, केळशी आणि अनेक गावांच प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर संसार कसा उभा करायचा असा प्रश्न लोकांना पडलाय.


पावसाने घरं पडली, जोरदार वाऱ्याने छपरं उडाली त्यामुळे लोकांना गेली काही दिवस उघड्यावर काढावी लागत आहेत.


कोकणात घराच्या अंगणात असलेली नारळ पोफळी, अंबा, फणस, काजूची झाडं ही घरातले एक सदस्यच असतात. अशी लहानपणापासून वाढवलेली अनेक झाडं काही मिनिटांमध्ये उन्मळून पडली.


गावंच्या गावं उद्धवस्त झाल्याने शेकडो नागरीक उघडयावर असून कोरोनामुळे त्यांच्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.


कोकणात प्रचंड पाऊस असतो. यावर्षी मान्सून वेळेत असल्याने लवकरच पावसाला सुरूवात होणार आहे. त्याआधी पुन्हा घरं उभारण्याचं आव्हान इथल्या लोकांसमोर आहे.