सम्राट मोगल असला तरी नाण्यावर श्री गणपती आणि पंतप्रधान असं का लिहिण्यात आलं, याचाही इतिहास आहे. हे नाणं महाराष्ट्रातील मूर्तजाबाद म्हणजे आताचं मिरज इथं तयार करण्यात आलं. मिरजचे तत्कालीन संस्थानिक पटवर्धन यांनी याची निर्मिती केली असून, पंतप्रधान म्हणजे पेशव्यांप्रती आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी त्यांनी आराध्य दैवत श्री गणपती आणि पंतप्रधान असं नाण्यावर अंकित केलं.
याबरोबरच दिल्लीचा मोगल सम्राट शाह आलम बादशाह गाजी यांचं नाव आणि हिजरी वर्षही नाण्यावर नमूद आहे. त्याकाळी संस्थानिक कुणीही असला तरी दिल्लीत ज्याचं शासन आहे, त्याच्या नावानंच नाणं प्रसिद्ध करण्याचा नियम होता. त्यानुसार या नाण्यावर श्री गणपती आणि पंतप्रधान या शब्दांसह सम्राटाचा पण उल्लेख केला गेला.
हे नाणं चांदीचं असून, 11.34 ग्रॅम एवढ्या वाजनाचं आहे. सध्या हे नाणं फार दुर्मिळ असून, मराठा साम्राज्याचा इतिहास सांगणारं आहे. इतिहास अभ्यासक अशोकसिंग ठाकूर यांनी हे नाणं मोठी किंमत मोजून अधिकृत लिलावातून खरेदी केलं. अशा वेगवेगळ्या कालखंडातील अनेक नाण्यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आज गणेशाची स्थापना झाली. या पार्श्वभूमीवर श्री गणपती लिहिलेलं नाणं त्यांनी समोर आणलं आहे.