PHOTO: चैत्र एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी 1 लाख भाविक पंढरपुरात दाखल
चैत्र एकादशीनिमित्त विठुरायांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी मंदिर समिती सज्ज झाली आहे. विठुरायांच्या दर्शनासाठी 1 लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. यंदा वाढता उन्हाळा लक्षात घेता विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना दशमीच्या दिवशी मसालेभात आणि थंडगार मठ्ठा तर एकदशीच्या दिवशी साबुदाणा खिचडी आणि ताक देण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे.


१५ आणि १६ एप्रिलच्या दरम्यान चैत्री यात्रा आहे. मुख्य चैत्र एकादशीचा सोहळा १६ एप्रिल रोजी संपन्न होईल. मंदिर समितीने दर्शन रांगेतील सुमारे २० हजार भाविकांना दशमी (ता.१५) दिवशी मसालेभात आणि मठ्ठा तर एकादशीच्या दिवशी साबुदाणा खिचडी आणि ताक देण्याचे नियोजन केले आहे.


साधारणपणे दर्शन रांगेतील प्रत्येक भाविकाला ताक आणि मठ्ठा मिळावा, यासाठी प्रत्येक दिवशी पाचशे याप्रमाणे दशमी आणि एकादशी असे दोन दिवस मिळून एक हजार लिटर दह्याची आर्डर दिली आहे. या दह्या पासून थंडगार ताक आणि मठ्ठा बनविण्यात येणार आहे.


पंढरपूर नगरपालिकेच्या बरोबरीने मंदिर समितीनेही यात्रेची जय्यत तयारी केली आहे. विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर समितीने यापूर्वीच शेडनेट उभा केल्यामुळे भाविकांना अतिशय सुखद अनुभव येत आहे. यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीने दर्शन रांगेसह मंदिर परिसरात पिण्याच्या स्वच्छ आणि थंडगार पाण्याची सोय केली आहे.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मंदिर परिसरात नगरपालिकेने पुरेशा स्वच्छता गृहाची सोय केली आहे. भाविकांना चंद्रभागेत स्नानासाठी पूरेसे पाणी राहावे म्हणून मंदिर समितीने स्वतःचे सुरक्षा कर्मचारी गोपाळपूर बंधाऱ्यावर नेमले आहेत.