

युरोपीय देशांमध्ये विशेषत: इटलीत लग्न करण्याकडे बॉलीवुड कलाकारांचा विशेष ओढा आहे. पर्यटकही फिरण्यासाठी युरोपला अधिक पसंती देतात. एकीकडे सुंदर शहरांसाठी प्रसिद्ध असलेल्या युरोपात एक शहर असेही आहे ज्याला ‘सिटी ऑफ शेम’ असं म्हटलं जातं. या शहराचं खरं नाव ‘मटेरा’ असं आहे. पण भुकबळी, रोगराई आणि इतर कारणांमुळं हे शहर बदनाम झालं आहे. या शहराचं रुप आता पुरतं पालटलं आहे. तसंच इथलं नागरिकत्वही तुम्हाला केवळ दीड हजार रुपयांमध्ये मिळतं.


‘मटेरा’ हे शहर जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. एकेकाळी वैभवसंपन्न असलेल्या भागातील या शहरात आज वीज नाही, पाण्यासाठी वणवण करावी लागते. या ठिकाणी आजही अनेक गुहा आहेत. यामुळं शहराला अंडरग्राउंड सिटी असंही म्हणतात. आधुनिक जगापासून दूर असलेल्या या शहरातील गुहेत लोक रहायचे. ते जंगली फळं खाऊन भीक भागायचे.


दक्षिण इटलीच्या एका टोकाला असल्याने इथं कोणत्याही सुविधा नव्हत्या. 80 ते 90 च्या दशकात हे शहर एवढं बदनाम झालं की त्याला ‘सिटी ऑफ शेम’च्या नावानं ओळखण्यात येऊ लागलं. लोक गुहेत राहू लागले होते. त्यांचा आधुनिकता आणि विकास यांच्याशी काहीच संबंध नव्हता.


1950 नंतर ‘मटेरा’तील लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काहीच वर्षांमध्ये 30 हजार लोकांनी ‘सिटी ऑफ शेम’ सोडलं. जे काही लोक तिथं होते त्यांनी त्याच अवस्थेत राहणं पसंद केलं.


काही काळानंतर इथल्या प्राचीनतेमुळं या शहराकडं चित्रपट निर्मात्यांची नजर वळली. या ठिकाणी अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालं. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळं सरकारनं याच्या विकासाकडं लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यानंतर परदेशी पर्यटकांनाही या ठिकाणाचं आकर्षण वाटू लागलं.


युनेस्कोने 1993 मध्ये या शहराचा समावेश जागतिक वारसा स्थळात केल्यानंतर इथली परिस्थिती सुधारली. आता या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना गुहेतील भिंतीचित्रं पाहता येतात.


‘सिटी ऑफ शेम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराला इटलीचा सांस्कृतिक राजधानी घोषित करण्यात आलं आहे. इथल्या प्राचीन गुहांमध्ये हॉटेल्स सुरु करण्यात आली आहेत. स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. या शहरात प्रदुषण होऊ नये यासाठी इथं गाडीने नाही तर पायी चालत फिरावं लागतं.