

देशभर मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) उत्साह आहे. विविध प्रदेशात वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. दिवशी तिळगूळ आणि खिचडी खाल्ली जाते. बिहारमध्ये दही, चिवडा आणि गूळ एकत्र करून दही चुरा गूळ (Dahi Chura Gur) हा पदार्थ तयार केला जातो. या दिवशी या पदार्थाना इतकं महत्त्व का आहे याची तुम्हाला माहिती आहे का?


सूर्याचं एका राशीतून दुसर्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते त्याला मकर संक्रांती असं म्हटलं जातं. यावेळी सूर्याचं दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत असतं. यानंतर दिवस हळूहळू मोठा होत जातो. सूर्याचे उत्तरायण झाल्यानं सर्व काळ हा शुभ सुरू होत असल्याची मान्यता आहे. या काळात केलेल्या कामांना यश येत असून याचे फळ तुम्हाला 100 पट मिळते अशी धारणा आहे. (फोटो सौजन्य- फर्स्ट पोस्ट)


या दिवशी तांदूळ आणि उडीद डाळीची खिचडी खाण्याची परंपरा आहे. तांदळाला चंद्राचं रूप देण्यात आलं असून डाळीला शनीचं रूप देण्यात आलं आहे. याचबरोबर हिरव्या भाज्यांना बुद्ध ग्रहाचं रूप देण्यात आलं आहे. या सगळ्यांचा सूर्य आणि मंगळाशी थेट संबंध असल्याने या पदार्थांची खीर करून खाल्ली जाते. या सर्व ग्रहांचा सूर्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याने अनेक ठिकाणी खिचडी पर्वदेखील भरवलं जातं.


याबाबत गुरू गोरखनाथ यांनी एक कहाणी खूप प्रचलित आहे. जेव्हा खिलजीने देशावर आक्रमण केलं तेव्हा चारही बाजूने संघर्ष सुरु होता. अनेकदा ऋषीमुनींना उपाशी राहावं लागत होतं. तेव्हा बाबा गोरखनाथ यांनी उडीद डाळीत तांदूळ, तूप आणि काही भाज्या एकत्र करून शिजवलं. ऋषी-मुनींचा हा पदार्थ खूप आवडला, त्यांची भूक भागली आणि आध्यात्मिक ऊर्जा देखील वाढली.


या पदार्थाला बाबा गोरखनाथ यांनी खिचडी हे नाव दिलं. त्यानंतर अनेक ठिकाणी मकर संक्रांतला खिचडी बनवण्याची परंपरा सुरू झाली. गोरखपूर येथे मकर संक्रांतला बाबा गोरखनाथ मंदिरात मोठ्या प्रमाणात खिचडी तयार करून तिचा नैवद्य दाखवला जातो.


भगवद्गीतेमध्ये संक्रांतीच्या दिवशी तीळ का खातात याविषयी एक गोष्ट सांगितली आहे. या पौराणिक गोष्टीनुसार, शनीला आपल्या वडिलांना म्हणजेच सूर्यदेवाला त्यांची आई आणि पहिली पत्नी संज्ञा यांच्यात आणि आपल्या दोन मुलांमध्ये भेदभाव केल्याचं आढळलं. यामुळे संतापलेल्या शनीने सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला. यानंतर या आजारातून बरे झाल्यानंतर सूर्यदेवानं शनीचं घर कुंभ रास जाळून टाकली. यामुळे शनी प्रचंड अडचणीत आला.


पण आपल्या मुलाचं दुःख पाहवलं न गेल्यानं सूर्य त्याच्या घरी गेले. यावेळी घरामध्ये तीळ सोडून सगळं जळालं होतं. त्याने सूर्यदेवाला याचाच भोग लावला. यामुळे भारावलेल्या सूर्यदेवाने त्याचे वैभव त्याला परत केले. यामुळे यादिवशी तीळ खाण्याची परंपरा सुरू झाली.


या दिवशी खिचडी आणि तीळगूळ खाण्याला वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. या दिवसात हिवाळा ऋतू सुरू असतो. यामुळे थंडी मोठ्या प्रमाणात असल्याने आणि सूर्य दुसऱ्या राशीत प्रवेश करत असल्याने आजार वाढण्याची शक्यता असते. थंडीत शरीराला उष्णता आणि स्निग्धतेची आवश्यकता असते. तिळामध्ये आणि खिचडीमध्ये गरम गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.. तसंच गुळातही उष्णता असल्याने या पदार्थांचे महत्त्व आहे.