

मूत्रप्रणालीमध्ये मूत्रपिंड, मूत्राशय, मूत्रवाहक नलिका आणि मूत्रमार्ग या चार घटकांचा समावेश होतो. मूत्रमार्गातील संसर्गामध्ये यापैकी कोणत्याही भागास संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र मूत्रमार्गाचा संसर्ग हा मूत्राशय आणि मूत्रमार्ग या मूत्रप्रणालीतील खालच्या दोन भागांना जास्त होताना दिसतो. या संसर्गाचं प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात आढळून येते.


रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं, रक्तातील शर्करा, मूत्रमार्गातील कोरडेपणा, मूत्रमार्गात अडथळे येणं इत्यादी कारणांमुळे मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग होऊ शकतो.


तीव्र मूत्रपिंडाचा रोग आरोग्यावर आणि स्त्रीबिजांचा प्रक्रियेवरही परिणाम करू शकतो आणि गर्भवती होण्याची शक्यता कमी होऊ शकते.


वारंवार होणाऱ्या संसर्गामुळे मूत्रपिंडांव्यतिरिक्त फेलोपियन ट्युब आणि गर्भाशयावर परिणाम होऊ शकतो आणि त्याद्वारे वंध्यत्वाचा धोका वाढू शकतो, असं मुंबईतील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या क्लिनिकल डायरेक्टर डॉ. सुलभा अरोरा यांनी सांगितलं. त्यामुळे मूत्रसंसर्गाकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांना भेट दिली पाहिजे आणि तसेच वंध्यत्वाबद्दल देखील चर्चा केली पाहिजे.


मूत्रमार्गाचा संसर्ग टाळण्यासाठी काही काळजी घेणंही गरजेचं आहे. शौच किंवा लघवी केल्यानंतर तेथील भाग स्वच्छ करताना नेहमी हात पुढून मागे नेणं आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीच्या स्वच्छतेमुळे योनीमार्गात जंतू जाऊन संसर्ग होण्याची शक्यता असते. योनीमार्गातील त्वचा दमट राहू नये यासाठी प्रयत्न करा, कारण अशा ओलसर भागावर विषाणू, जिवाणू किंवा बुरशी सहज वाढतात.


योनीमार्गाची स्वच्छता राखा या संवेदनशील भागाची स्वच्छता करण्यासाठी रासायनिक उत्पादनं वापरणं टाळा. रासायनिक उत्पादनांबरोबरच स्प्रे आणि पावडरचा देखील वापर करू नका. योनीमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी पावडर किंवा रासायनिक द्रव्य असलेला साबण वापरत असाल तर काळजीपूर्वक वापर करा. ही पावडर किंवा साबण योनीमार्गात जाणार नाही याची काळजी घ्या. यामुळे येथील त्वचा कोरडी पडते आणि संसर्ग होतो.


शरीरातून टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी भरपूर पाणी प्या. यामुळे ओटीपोटातील वेदना आणि सूज यांसारख्या समस्येवर मात करण्यास देखील मदत होईल. क्रॅनबेरीचा ज्युस प्यायल्यानंदेखील मूत्रमार्गाच्या समस्येशी सामना करण्यास मदत होते.