

निरोगी आणि सुदृढ आयुष्यासाठी आपली दिनचर्या सुधारण्याची गरज असते. सुदृढ राहूनच आपण आपलं हे दररोजचं धकाधकीचं आयुष्य आनंदाने जगू शकतो. सुदृढ राहण्यासाठी योग्य जेवण आणि पुरेशी झोप घेणं फार गरजेचं आहे. तुम्हालाही निरोगी राहून यश मिळवायचं असेल तर पुढील उपाय एकदा करून पाहाच.


योग्य झोपेची गरज- थकवा आणि ताण दूर करण्यासाठी आवश्यक तेवढी झोप घेणं गरजेचं आहे. गरजेपेक्षा जास्त ताण आणि थकव्यामुळे अनेकांना आवश्यक तेवढी झोप मिळत नाही. सतत धावण्याच्या नादात अनेकदा आपण आपल्या आरोग्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. पण शरीरच निरोगी राहिलं नाही तर या सर्व गोष्टी निरर्थक आहेत हे कोणाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे भरपूर प्रमाणात झोप घ्या.


पोटाची काळजी घ्या- जंक फूड किंवा काहीही खाल्याने त्याचा सरळ परिणाम पाचनशक्तीवर होतो. त्यामुळे तुम्ही काय खाताय याकडे पूर्ण लक्ष असू द्या. आपल्या आतड्यांमध्ये असे काही बॅक्टेरिया असतात जे आपल्या आरोग्याची काळजी घेतात. जे काही आपण खातो, त्यातले पोषक पदार्थ ग्रहण करण्याचं काम हे बॅक्टेरिया करतात. त्यामुळे बंद डब्यातले जेवण तसेच सॅनिटायझरचा वापर कमी केला पाहिजे.


श्वसनाचा व्यायाम करा- एक दीर्घ श्वास आपलं मन शांत करू शकतो. झोपण्याअगोदर पाच मिनिटांसाठी श्वसनाचे व्यायाम करा. यामुळे मनाला शांती मिळते तसेच डोक्यातले विचार दूर होतात. यामुळे झोपही लगेच येते आणि रक्ताभिसरण होण्यास मदत होते.


जेवणाची वेळ निश्चित करा- शरीराला काही चांगल्या सवयी लावणं आवश्यक आहे. या चांगल्या सवयींमुळेच मन आणि बुद्धी सक्रिय राहण्यास मदत होते आणि नवीन सकारात्मक विचार मनात येतात. या सर्वांसाठी दोन वेळचं जेवण योग्य वेळी होणं गरजेचं आहे. नाश्ता आणि दुपारचं जेवण याच्यात किमान चार तासांचं अंतर असणं आवश्यक आहे. सध्याच्या धकाधुकीच्या जीवनात एक वेळ पाळणं कठीण असलं तरी शक्यतो ठरलेल्या वेळेच्या आसपास जेवण्याचा प्रयत्न करा. तसेच भरपूर पाणी पीत रहा.