

'कबीर सिंग' या आगामी फ्लिक चित्रपटाच्या चित्रिकणात व्यस्त होण्याआधी शाहीद कपूर त्याच्या कुटुंबासोबत थायलंडच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचलाय. थायलंडच्या समुद्र किनाऱ्यावर त्याच्याबरोबर मीरा राजपूत, मिशा आणि जोन ही दोन मुलंसुद्धा सुट्टीची मजा लुटत असल्याचं दिसून आले. याठिकाणी शिहीदने पत्नी मीराबरोबर काढलेली सेल्फी, तर मीरा राजपूतने दोन्ही मुलांचे बिचवर खेळतानाचे फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. दोघांनी काढलेल्या सेल्फीमध्ये थायलंडच्या या समुद्र किनाऱ्याचं सौदर्य अगदी खुलून दिसत आहे. शाहिद आणि मीराचे हे फोटो पाहून जर तुम्हीसुद्धा थाडलंडमध्ये सुट्टी घालविण्याचा विचार करत असाल तर, इथल्या समुद्र किनाऱ्यांची माहिती तुम्हाला असायलाच हवी.


रेले बीच, क्राबी - या सुंदर बीचवर जाण्यासाठी तुम्हाला आधी बोटीने सफर करावी लागेल. या समुद्र किनाऱ्याचं वैशिष्ट्यं म्हणजे इतर समुद्र किनाऱ्यांप्रमाणे इथे अजिबात लोकांची गर्दी नाही. त्यामुळे तुम्हाला इथे शांततेने तुमच्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवता येईल. इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रॉक क्लाईंबिंग, स्नॉर्कलिंग आणि कयाकिंग सारखे अॅडव्हेंचर सुद्धा तुम्हाला याठिकाणी करता येतील.


पॅरा नांग बीच, क्राबी - रेले बीचपासून हे वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तुम्ही या ठिकाणी जाण्यासाठी एखादी बोट रेंटवर घेऊ शकता. नाइटलाइफचा आनंद घेणाऱ्यांसाठी हे बीच सर्वोत्तम ठिकाण आहे. गाईडला सोबत घेऊन तुम्ही इथल्या लेण्या पाहू शकता.


पटोंग बीच, फुकेत - थायलंडमधलं हे अत्यंत प्रसिद्ध बीच आहे. इथे तुम्हाला रेस्टॉरंट पासून ते शॉपिंग सेंटरपर्यंत सगळं काही मिळेले. या समुद्र किनाऱ्याला भेट देणाऱ्यांच्या कधीच निराशा पदरी पडत नाही. इथल्या भरपूर आठवणी तुम्हाला आयुष्यभर साथ देतील.


कोह लिबोंग, ट्रँग - या बीचवर पसरलेली पांढरी शुभ्र रेती पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हे अद्याप थायलंडमधील सर्वात अनोळखी ठिकाणांपैकी एक आहे. इथल्या वातावरणात एक वेगळीच जादू आहे, जीचा इथे भेट दिल्यानंतरच तुम्हाला अनुभव घेता येईल.