

बहुतेक गोष्टींमुळे आपल्या व्हजायनाला हानी पोहोचू शकते हे महिलांना माहिती असतं. अनेकांसह लैंगिक संबंध, व्हजायनासाठी चुकीच्या वस्तूंचा वापर याचा दुष्परिणाम होतो. मात्र काही गोष्टी अशा आहेत, ज्या थेट व्हजायनाच्या संपर्कात येत नाहीत मात्र त्यामुळे व्हजायनाला अप्रत्यक्षरित्या हानी मात्र पोहोचत असते.


वेब एमडीवर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार काही सवयी आणि समस्यांचा व्हजायनावर दुष्परिणाम होत असतो.


धूम्रपान आपलं हृदय, फुफ्फुसांसाठी घातक आहे, तसंच ते व्हजायनासाठीदेखील. स्मोकिंगमुळे सर्व्हिकल कॅन्सरचा धोका वाढतो.


व्हजायना स्वच्छ राखणं गरजेचं आहे, मात्र अतिस्वच्छता व्हजायनासाठी चांगली नाही. व्हजायनाचा बाहेरील भाग तुम्ही सौम्य साबणाचा वापर करून स्वच्छ करू शकता पण व्हजायनाचा आतील भाग अशा पद्धतीनं स्वच्च करण्याची गरज नाही. व्हजायना आतून नैसर्गिकरित्या स्वच्छ राहते.


मधुमेह असल्यास त्याचा परिणामही व्हजायनावर होतो. यीस्ट इन्फेक्शन हे महिलांमधील मधुमेहाचं पहिलं लक्षण आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढणं यीस्टसाठी पोषक आहे. व्हजायनल टिश्यूमध्ये यीस्ट वाढू लागतं.


लठ्ठपणादेखील व्हजायनावर परिणाम करू शकतो. विशेषतः पोटाजवळ जास्त चरबी असेल तर पेल्व्हिक, मूत्राशय आणि व्हजायनावर ताण येतो. यामुळे जेव्हा तुम्ही खोकता, शिंकता तेव्हा लघवी झाल्यासारखंही तुम्हाला जाणवेल.


बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यासही व्हजायनावर परिणाम होतो. व्हजायना आणि रेक्टम एकमेकांच्या जवळ असतात. या दोघांना जोडणारी त्वचा एकच असते. त्यामुळे जेव्हा बद्धकोष्ठता होते तेव्हा व्हजायनावरदेखील ताण येतो.


तुम्हाला आश्चर्य वाटेल पण व्यायामामुळे व्हजायनावर दुष्परिणाम होतो. हृदय, स्नायू आणि मूडसाठी व्यायाम ठिक आहे. मात्र व्यायामामुळे जो घाम येतो तो व्हजायनासाठी चांगला नाही. कपड्यांमध्ये घाम तसाच राहिला तर व्हजायनल यीस्ट आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शन बळावू शकतं. त्यामुळे घामानं भिजलेले कपडे घालून राहू नका. व्यायामानंतर अंघोळ करून कोरडे कपडे घाला किंवा लगेच अंघोळ शक्य नसेल तर किमान घाम पुसून कपडे बदला.