

भारतात सध्या दोन कोरोना लशींच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान जगात सर्वात पहिली कोरोना लस लाँच करणाऱ्या रशियानं आता आपल्या तिसऱ्या लशीलाही मंजुरी दिली आहे.


रशियाच्या स्पुतनिक V, एपिवॅकनंतर आता तिसरी लस आहे ती कोविवॅक. चुमाकोव्ह सेंटरनं तयार केलेली ही लस आहे. या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल मार्चमध्ये सुरू होणार आहे. मार्चमध्येच या लशीचा लसीकरण मोहीमेत समावेश केला जाणार आहे.


तीन लशीचा वापर करणारा रशिया हा जगातील पहिला देश असेल, असं रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्टिन यांनी ही घोषणा केली आहे.


ऑगस्ट 2020 साली रशियाने आपली पहिली कोरोना लस स्पुतनिक V लाँच केली होती. मॉस्कोतील गॅमेलिया इन्स्टिट्यूटनं तयार केलेली ही लस. लशीचं क्लिनिकल ट्रायल पूर्ण होण्याआधीच तिला मंजुरी देण्यात आली. सप्टेंबरमध्ये लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू केलं आणि त्याच्या प्राथमिक अहवालात लस 91.04 टक्के प्रभावी दिसल्यानंतर डिसेंबरमध्ये लसीकरण सुरू करण्यात आलं.


त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये रशियानं आपली दुसरी लस एपिवॅककोरोनाला आपात्कालीन वापराची मंजुरी दिली. नवोसिबिर्स्कमधील व्हेक्टर इन्स्टिट्यूटनं ही लस तयार केली.


रशियाच्या तिसरी लस कोविवॅकला 20 फेब्रुवारीला मंजुरी देण्यात आली आहे. ही लस whole virion आहे. म्हणजेच यामध्ये निष्क्रिय कोरोनाव्हायरस आहे.