

हार्मोन असंतुलन, वाढतं प्रदूषण आणि धूळ यामुळे सध्या प्रत्येकाला मुरुमांच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. रोजच्या धावपळीच्या जगात आपल्याला त्वेचेची काळजी घेणे शक्य नाही. पण काही पदार्थांच्या सेवनाने मुरुमांची समस्या दूर करू शकतो.


ब्राऊन राइसमध्ये व्हिटॅमिन बी, प्रोटीन, मॅग्नेशिअम आणि अँटिऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असतं. व्हिटॅमिन बी आपल्या शरीरातील अतिरिक्त तणावं कमी करुन हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवण्याचं काम करतं.


लसूण हा एक असा पदार्थ आहे ज्यात नैसर्गिकरित्या ऍलिसिनचं प्रमाण खूप जास्त असतं. ऍलिसिन आपल्या शरीरातील अनेक हानिकारक बॅक्टेरीया नष्ट करुन आपल्या त्वचेला मुरुमांपासून वाचवण्याचं काम करतं.


ब्रोकोलीमध्ये त्वचेची स्वच्छता करण्याचे गुणधर्म असतात.यात व्हिटॅमिन ए, बी, सी, ई आणि के यांचं प्रमाण जास्त असतं. जे आपल्या त्वचेचं प्रदूषणापासून रक्षण करतात.


मासे ओमेगा -3 आणि 6-फॅटी ऍसिडचे स्त्रोत आहेत. हे अॅसिड त्वचेतील जळजळ कमी करते त्यामुळे मासे मुरुमे येणाऱ्या त्वचेसाठी फार उपयुक्त ठरतात. सरडीन आणि सॅल्मन या माशांचं सेवन त्वचेसाठी फायदेशीर ठरतं.


जस्त आणि सेलेनियम सारख्या खनिजांच्या कमतरतेमुळे मुरुमांची समस्या उद्भवते. सुक्या मेव्यात सेलेनियम, व्हिटॅमिन ई, तांबे, मॅग्नेशियम, मॅंगनीज, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात जे निरोगी त्वचेसाठी उपयुक्त ठरतात.


निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी बडीशेपचे नियमित सेवन फायदेशीर ठरते. यामुळे त्वचेवरील सूज कमी होऊन त्वचेतील हानिकारक द्रव्ये बाहेर टाकली जातात.


ग्रीन टी प्यायल्याने मुरुमांची समस्या कमी होते. याशिवाय ग्रीनच्या वापरलेल्या टी बॅग थंड करुन मुरुमे आलेल्या जागेवर 10-15 मिनिटं लावून ठेवल्यास मुरुमांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.