

भारतात सध्या ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीचं भारतात ट्रायल सुरू असून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियामार्फत या लशीचं भारतात उत्पादन घेतलं जातं आहे. दरम्यान आता भारतात आणखी एका विदेशी कोरोना लशीचं उत्पादन घेतलं जाणार आहे. (फोटो सौजन्य - रॉयटर्स)


रशियाच्या Sputnik V लशीचं भारतात उत्पादन घेतलं जाणार आहे. रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेन्ट फंड (Russian Direct Investment Fund - RDIF) आणि हैदराबादमधील हेट्रो फार्मा कंपनीचा करार झाला आहे.


हेट्रो कंपनी भारतात वर्षाला 100 दशलक्षपेक्षा अधिक डोस तयार करणार आहे, अशी माहिती रशियानं दिली आहे. 2021 पासून भारतात रशियन कोरोना लशीचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली जाणार आहे.


डॉ. रेड्डीज कंपनीमार्फत भारतात या लशीचं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. ट्रायलसाठी रशियामार्फत डोस पुरवण्यात आले आहे.


मॉस्कोतल्या गमालिया इन्स्टिट्युन ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीनेही ही लस तयार केली आहे. रशियाची पहिली लस Sputnik V एडिनोव्हायरस व्हेक्टरवर आधारित आहे. या लशीला 11 ऑगस्टला मंजुरी देण्यात आली आणि यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला.


ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीलाही देण्यात आली होती. आपली लस कोरोनापासून बचावासाठी 95 टक्के परिणामकारक ठरल्याचं रशियानं सांगितलं आहे.