

सिगारेट ओढणं हे प्रत्येकाच्याच आयुष्याला किती धोकादायक आहे हे सारेच जाणतात. यात जे लोक सिगारेट ओढत नाहीत त्यांचाही समावेश होतो. टीव्ही आणि रेडिओवर तसंच वृत्तपत्रांमध्ये धुम्रपान न करण्याचे अनेक दाखले दिले जातात. पण तरीही सिगारेट ओढणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही.


सरकारने यावर टॅक्स वाढवला तरी लोकांनी सिगारेट ओढणं सोडलं नाही. धूम्रपान आणि तंबाखूची लोकांमधली सवय कमी करण्यासाठी जपानच्या एका मार्केटिंग कपंनीने यावर एक पर्याय काढला आहे. पिआला इंक कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सिगारेट ओढण्यापासून प्रवृत्त करते आणि सृदृढ आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करत आहे.


याचसंबंधी कंपनीने एक प्रस्ताव मंजूर केला आहे. यात त्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे जे सिगारेट ओढत नाहीत. जे सिगारेट ओढत नाहीत त्यांना वर्षाला सहा सुट्ट्या जास्त मिळणार आहे. या सुट्ट्या ते वर्षभरात कधीही वापरू शकतात.


कंपनीतील एका कर्मचाऱ्याने धुम्रपान करणाऱ्यांची तक्रार केली. यात त्याने ते कर्मचारी जास्त ब्रेक घेतात आणि टाइमपास करतात असंही म्हटलं गेलं. एवढंच नाही तर या सगळ्याचा कंपनीच्या प्रोडक्टिविटीवरही परिणाम होतो असं त्याने स्पष्ट केलं.


ही कंपनी इमारतीच्या 29 व्या मजल्यावर आहे. तर स्मोकिंग झोन बेसमेंटमध्ये आहे. कंपनीने वेळेचा हिशोब लावल्यानंतर हा निर्णय घेतला. या कंपनीचे जवळपास 35 टक्के लोक धुम्रपान करतात.


कंपनीच्या या निर्णयानंतर चार कर्मचाऱ्यांनी धुम्रपान सोडलं. याशिवाय आपल्या आरोग्याकडेही अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली.