

भारतात उपवासाला सैंधव मीठ वापरलं जातं. आपल्या नेहमीच्या जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या मीठापेक्षा हे मीठ दिसायला आणि गुणधर्मानं वेगळं असतं. नवरात्र किंवा इतर उपवास, व्रतवैकल्य करताना हे मीठ वापरतात.


सैंधव मीठ पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि भूक वाढण्यासाठी हे उपयुक्त आहे. या मीठाला पहाडी मीठ असंही म्हणतात. पण तुम्हाला माहित आहे का हे मीठ पाकिस्तानमध्ये असलेल्या खाणीत सापडतं.


सिंध किंवा सिंधू प्रांतातलं मीठ म्हणून याला सेंधा किंवा सैंधव मीठ असंही म्हणतात. हे मीठ पाकिस्तानमधील लाहौरमधून येत असल्याने लाहोरी मीठ या नावानंही हे ओळखलं जातं.


पाकिस्तानातील पंजाबमध्ये कोह पर्वत रांगेत 'खेवडा मीठ खाण' आहे. ही जगातील सर्वात मोठी मीठाची खाण आहे. तर कॅनडातील ओंटारिओत सर्वात मोठी खाण आहे.


खेवडाच्या मीठ खाणीतून दरवर्षी जवळपास 4.65 लाख टन मीठ काढलं जातं. ही खाण इतकी मोठी आहे की यातून पुढच्या 500 वर्षांपर्यंत मीठ काढता य़ेईल. या खाणीत तब्बल 40 किलोमीटर लांब बोगदा आहे.


सैंधव मीठाच्या खेवडा खाणीच्या शोधाची कहाणी रंजक आहे. असं म्हणतात की, सिकंदरच्या काळात ही खाण शोधली गेली. जेव्हा सिकंदरने खेवडा भागावर चढाई केली तेव्हा सिकंदरच्या घोड्यांनी तिथल्या भिंती चाटायला सुरुवात केली. त्यानंतर तिथं मीठाची खाण असल्याचं माहिती झालं.