

17 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होतो आहे. अनेक जण उपवास ठेवणार आहेत. सध्या कोरोना काळात शरीर हेल्दी ठेवणंही महत्त्वाचं आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी महत्त्वाचा आहे तो योग्य आणि पोषक आहार.


अनेक लोक उपवासात काहीच खात-पित नाहीत. मात्र असं करू नका यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळणार नाहीत आणि आजारी पडण्याची शक्यता अधिक वाढते.


त्यामुळे उपवासही राखला जाईल आणि शरीरही हेल्दी राहिल असा आहार घ्या. नवरात्रीत उपवास करताना नेमका आहार कसा असावा याबात आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी गेल्या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने मार्गदर्शन केलं होतं.


सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी ताजी फळं किंवा मूठभर सुकामेवा खा. मणुका आणि केसर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खाऊ शकता.


त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये शिंगाडा पिठाची भजी, साबुदाणा खिचडी, दही आणि रताळं, चणापुरी किंवा हलवा खाऊ शकता.


दुपारच्या जेवणात बटाटा किंवा अरेबीच्या भाजीसह राजगिरा किंवा शिंगाडा पिठाची रोटी खा. उपवासाचं थालीपीठ बनवून खा. वरीचे तांदूळ आणि कढी असा आहार असावा.