कोरोनामुक्त होणं म्हणजे कोरोनाविरोधातील लढा पूर्णपणे जिंकणं असं नाही, असंच गेल्या काही महिन्यांपासून दिसून येतं आहे. कारण कोरोनावर विजय मिळवला तरी खरी लढाई सुरू होते ती त्यानंतर. कारण कोरोनाशी झुंज देताना जितका त्रास होतोय त्यापेक्षाही भयंकर त्रास होतो आहे ती कोरोनावर मात केल्यानंतर. कोरोनामुक्त झाल्यानंतर उद्भवणारे पोस्ट कोव्हिड कॉम्प्लिकेशन (POST COVID COMPLICATION) खूपच भयावह आहेत.
Post covid complications ची भयावह परिस्थिती भारतात समोर आली आहे. कोरोना अक्षरश: फुफ्फुस पोखरून काढतो आहे. त्यामुळे फायब्रोसिससारख्या फुफ्फुसाच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनाविरोधात युद्ध जिंकलेल्या बड्या नेत्यांनी पोस्ट कोव्हिड कॉम्पिलकेशनमुळेच आपला जीव गमावला आहे.
27 नोव्हेंबरला शरद पवार यांच्या जवळचे मानले जाणारे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके (Bharat bhalke) यांनी कोरोनावर मात केली. मात्र कोरोना विषाणूमुळे फुफ्फुसात झालेला संसर्ग वाढला आणि गुंतागुंत निर्माण झाली. पोस्ट कोविड त्रासांमुळे त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली आणि प्रकृती गंभीर झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला.
23 नोव्हेंबरला आसामचं मुख्यमंत्रिपद भूषवणारे काँग्रेस नेते तरुण गोगोई (Tarun Gogoai) देखील याच कारणामुळे आयुष्याची लढाई हरले. त्यांना कोरोना व्हायरसची (Covid-19) लागण झाली होती. प्लाझ्मा थेरपीसुद्धा त्यांच्यावर केली गेली. त्याला प्रतिसाद मिळाला आणि कोरोनावर त्यांनी मात केली. पण त्यानंतर महिन्याभरात त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली. त्यांना पुन्हा एकदा श्वास घ्यायला त्रास जाणवू त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचा मृत्यू झाला.
25 सप्टेंबरला याच पोस्ट कॉम्प्लिकेशनमुळे मनोरंजन विश्वानंदेखील एका गायक गमावला. एसपी बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना ऑगस्टमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यावर त्यांनी मात केली होती. त्यातून ते बरे होत असताना त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यांच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी झाली होती, श्वास घ्यायला त्रास होत होता, शारीरिक शक्तीही नव्हती, अशी माहिती त्यांचा मुलगा एसपी चरण यांनी दिली होती. त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं.
31 ऑगस्टला देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (pranab mukherjee died) यांचंही दीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांच्यावर 10 ऑगस्ट रोजी मेंदूवर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. काही दिवस ते व्हेंटिलेटरवरच होते.
आता तर कोरोनाविरोधात युद्ध देणारा आणखी एक बडा नेता अशाच कोरोना संक्रमणानंतर उद्भणाऱ्या परिस्थितीशी झुंज देतो आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) 12 नोव्हेंबरला ते कोरोना पॉझिटिव्ह होते. 28 नोव्हेंबरला दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी आपली तपासणी करून घेतली. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला पण फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झालं आहे.
कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख आणि प्रिन्स अली खान रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय ओक यांनी पोस्ट कोव्हिड कॉम्पिकेशनमुळे रुग्णालयाच्या कामकाजातून जवळपास तीन महिने विश्रांती घेतली आहे. 13 जूनला त्यांना कोरोनाची लागण झाले. काही दिवसांतच त्यांनी कोरोनाला हरवलं आणि पुन्हा रुग्णालयात ते रूजू झाले. मात्र त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. पुन्हा उपचार घेऊन 6 जुलैला ते रुग्णालयातून घरी परतले, 26 जुलैला रुग्णालयात कार्यरत झाले. पण नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यापासून त्यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे. कोरोना संसर्गामुळे त्यांच्या फुफ्फुसावर जास्त परिणाम झाला आणि त्यांना फायब्रोसिस झाला.
द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार संपूर्ण जगात 6 कोटींहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी अधिकतर मध्यम आणि कमी दर्जाच्या संसर्गाचा सामना करीत होते. यामध्ये केवळ 10 टक्के गंभीर रुग्ण होते. ज्यांना गंभीर कोविड-19 न्युमोनिया झाला आहे. मात्र 5 टक्के लोक असे आहेत ज्यांना एक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS) नावाच्या आजाराचा सामना करीत आहेत. म्हणजे हे 5 ते 10 टक्के लोक आहे, ज्यांना लंग फायब्रोसिसचा (Lung Fibrosis) त्रास जाणवत आहे.