

शरीराच्या काही भागावर येणारे केस म्हणजे तरुण वयात पदार्पणाचं लक्षण. पण केस फक्त डोक्यावरच चांगले वाटतात शरीराच्या इतर भागावर नाही, असा सर्वसामान्य समज आहे. त्यामुळे फक्त महिलाच नाही तर पुरुषही शरीरावरील अनावश्यक केस काढून टाकतात. त्यामध्ये गुप्तांगावरील केसांचाही समावेश आहे.


प्युबिक हेअर काढण्याकडे महिलांचा कल असतो. यामुळे गुप्तांग स्वच्छ राहतं आणि सेक्सदरम्यानही सोयीस्कर असतं असं अनेकांना वाटतं. मात्र नैसर्गिकरित्या आपल्या शरीरावर असलेले हे केस काढणं किती योग्य आहे.


शरीराची रचना गरजेनुसारच असते. प्युबिक हेअर हे अनावश्यक नाही तर त्यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणूंपासून संरक्षण मिळतं. प्रजनन अवयवांचं तापमान नीट राखलं जातं. सेक्सदरम्यान घर्षणामुळे गुप्तांगमध्ये होणारी जळजळ, सूज यापासून बचाव होतो.


प्युबिक हेअर काढताना कितीही खबरदारी घेतली तरी लहानमोठी दुखापत होतेच आणि त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. काही अभ्यासानुसार गुप्तांगावरील केस काढल्यानं सेक्सुअली ट्रान्समिटेड आजारांचा धोकाही बळावतो.


वॅक्समार्फत प्युबिक हेअर काढल्यानंही हानी पोहोचू शकतो. त्वचेवरील छिद्रं नीट काम करत नाहीत. शिवाय प्रजनन अवयवांजवळ बॅक्टेरियांची निर्मिती होण्याचा धोकाही वाढतो.


न्यूज 18 बंगालीच्या रिपोर्टनुसार, आरोग्य तज्ज्ञ एमिली गिबसन यांनी सांगितलं, शरीरावर केस असणं चांगलं आहे. यामुळे त्वचेचं संरक्षण होतं. गुप्तांगावरील केसही गुप्तांगाला संरक्षण देतात. गुप्तांगाला कोणतीही दुखापत होत नाही. अस्वच्छता थेट गुप्तांगात जात नाही.