गेल्या 100 वर्षांमध्ये भारतीय पुरुषांच्या विचारसणीत प्रचंड बदल झाले आहेत. 100 वर्षांपूर्वी भारतीय पुरुषांचे जे विचार होते, संकल्पना होत्या त्यात आता या 21व्या शतकात बरेच बदल झालेले दिसतात. एके काळी भारतीय पुरुषांचा शब्द म्हणजे कुटुंबात ब्रह्मवाक्य असे. त्यांच्यापुढे कोणालाही, विशेषत: महिलांना काहीही बोलण्याची मुभा नव्हती. पुरुषांचं म्हणणं कोणत्याही परिस्थितीत ऐकणं महिलांना भाग असे. महिलांनी घराबाहेर पडणं आणि नोकरी करणं याचा विचार करणंही अशक्य होतं; मात्र हळूहळू पुरुषांची मानसिकता बदलली आणि महिलांची परिस्थितीही बदलली. भारतात महिला घराबाहेर पडण्याचा विचारही करू शकत नव्हत्या. घरात असतानाही डोक्यावरून पदर घेणं, घूंघट घेणं आवश्यक होतं. लिहिणं-वाचणं, महिलांचं शिक्षण याबद्दल तर विचारही नव्हता. महिलांचं आयुष्य अत्यंत खडतर होतं. त्या फक्त आदेश पाळण्यासाठी असत. पुरुषांचा शब्द अंतिम होता. त्याविरोधात बोलणं हा अक्षम्य अपराध मानला जात असे.
1920 च्या आसपासचा काळ - भारतात पहिल्यांदा मुलींसाठी काही शाळा उघडल्या गेल्या तेव्हा रुढीवादी वर्गाने त्याला कडाडून विरोध केला. समाजाशी लढून मुलींना शाळेत पाठवण्याची हिंमत कोणाचीच नव्हती. शाळेत जाणाऱ्या मुलींच्या कुटुंबांवर सामाजिक व जातीय बहिष्कार टाकण्यात आला. घरांतील स्त्रीची स्थिती कमी-अधिक प्रमाणात नि:शब्द बाहुलीसारखी होती.
1940 - विरोध असतानाही शाळेत जाणाऱ्या महिलांच्या संख्येत भर पडत होती. आपल्या घरातल्या स्त्रियांनाही लिहिता-वाचता आलं पाहिजे, त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे असं मानणारा पुरुषांचा एक गट निर्माण झाला होता; पण तरीही महिलांच्या परिस्थितीत फारसा बदल झालेला नव्हता. त्यांनी आपलं तोंड बंद ठेवून पुरुषांचा प्रत्येक शब्द ऐकणं बंधनकारक होतं. काहीही असलं तरी घरातला पुरुष त्यांच्यासाठी देवच होता.
1960- परिस्थिती काहीशी बदलली असली तरी अजूनही घराचं पुढारलेपण पुरुषांकडेच होतं. त्यांच्याच मर्जीवर घर चालत असे. स्त्रियांवर अजूनही बंधनं होती. त्यांच्यासाठी मर्यादा आखून दिलेल्या होत्या. घूंघट प्रथा अजूनही सुरू होतीच; पण आपणही माणूस आहोत आणि कुटुंबात आपल्यालाही महत्त्वाचं स्थान असलं पाहिजे असं आता स्त्रियांनाही वाटू लागलं होतं.
1980 - महिला आंदोलनाचे आता थेट परिणाम होऊ लागले होते. स्त्रियांच्या अधिकाराबद्दल गांभीर्यानं बोललं जाऊ लागलं होतं. महिला संघटनांचं म्हणणं गांभीर्यानं ऐकलं जाऊ लागलं. स्त्रियांनी काही नवीन करिअरच्या वाटाही शोधायला सुरुवात केली होती. आर्थिक स्वावलंबनाबद्दल महिला गांभीर्यानं विचार करू लागल्या. अर्थात पुरुषांमधला मोठा गट या या बदलत्या परिस्थितीमुळे नाराज होता. घरात अजूनही त्यांचा रुबाब चालत असे; पण पहिल्यांदाच त्यांना आता विरोधही होऊ लागला होता.
1990 - संपूर्ण जगात बदलाचे वारे वाहत होते. जागतिकीकरणाचे (Globalization) वारे वाहू लागले होते. महिलांमध्ये अगदी कपड्यांपासून ते बोलण्यापर्यंत एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला होता. त्यांचा आता स्वत:वर विश्वास होता. लाजाळू, काहीही न बोलणाऱ्या महिलांची जागा आता आत्मनिर्भर, आत्मविश्वासू महिलांनी घेतली होती. शहरांतल्या महिलांची परिस्थिती बदलली होती; पण छोटी शहरं आणि गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणता अजूनही तशीच परिस्थिती आहे. पुरुष आता बदलला होता आणि नवीन बदलत्या परिस्थितीशी तडजोड करायलाही शिकला होता.
21 व्या शतकाची सुरुवात - वेगळ्याच प्रकारच्या स्त्री-पुरुषांचा उदय झाला होता. स्त्री-पुरुष आता समान पातळीवर काम करू लागले. पती जास्त संवेदनशीलही बनला होता. नोकरी करणाऱ्या आपल्या पत्नीबरोबरचं त्याचं आता वेगळंच नातं निर्माण झालं होतं. वर्चस्ववादी पुरुषाची आता केवळ आठवण उरली होती. असं म्हटलं जातं, की पुरुष आता पूर्णपणे बदलला आहे. तरीही प्रश्न येतोच, की खरोखरच पुरुष बदलला आहे का?