

नव्या दिवसाची सुरुवात असो वा मग थकवा घालवायचा असो. सर्वांचीच पहिली पसंती असते ती फक्त एक कप चहाला. सकाळ-संध्याकाळच्या चहा व्यतिरिक्त आपण ऑफिसच्या वेळेतही चहा पितो.


अनेक लोकांना सकाळी उठल्यावर बेड टी घेण्याची सवय असते. अशा लोकांना झोपेतून उठण्यासाठीही चहाची गरज पडते. नाहीतर त्यांचा संपूर्ण दिवस बिघडून जातो.


सकाळी ताजतवाणं करणारा आणि दिवसभराचा थकवा घालवणारा हा चहा आपल्या शरीराला किती नुकसान पोहोचवतो याची मात्र आपल्याला कल्पना देखील नसते.


खरंतर चहामध्ये अनेक प्रकारचे अॅसिड असतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी आपण चहा घेतला तर दुष्पपरिणाम आपल्या पोटावर होतो.


सकाळी जेव्हा आपण उठतो त्यावेळी आपण उपाशी असतो. कारण झोपेच्या 8-9 तासांत आपण काहीच खाल्लेलं नसतं. अशावेळी उठल्या उठल्या चहा घेतल्यास आपल्याला अल्सर आणि गॅस सारखे आजार होण्याच्या शक्यता वाढतात.


सध्या बाजारात चहाचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. पण यातील कोणताही चहा रिकाम्यापोटी घेणं आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. याशिवाय दुधाचा चहाही आपल्या शरीरासाठी चांगला नाही.


जर तुम्ही दुधाचा चहा पित असाल आणि तुम्हाला वाटतंय की चहा सोबत तुमच्या पोटात दुधही गेलं आहे. तर हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कारण चहात दूध घातल्यावर चहातील एंटीऑक्सिडंटचं प्रमाण कमी होतं परिणामी शरीरातील तकवा दूर होण्याऐवजी आपल्याला जास्त थकवा आल्यासारखं वाटतं.


तुम्ही जर कमी दुधाचा स्ट्राँग चहा पित असाल तर असा चहा सुद्धा तुमच्या पचन क्षमतेला नुकसान पोहोचवतो. तसेच यामुळे तुम्हाला पोटाचे विकार होण्याची शक्यता असते.