फक्त काही मिनिटं टाळतील गंभीर आजारांचा धोका; ठणठणीत महिलेनंही कराव्यात 10 तपासण्या
महिला (woman) आपल्या कुटुंबाचं आरोग्य सांभाळतात मात्र आपल्या आरोग्याच्या (woman health) समस्यांकडे सामान्य समजून दुर्लक्ष करतात. मात्र या छोट्या समस्या पुढे जाऊन गंभीर आजाराचं रूप घेऊ शकतात.


अनेक आजार असे आहेत. ज्याची सुरुवातीला लक्षणं दिसून येत नाही आणि जेव्हा लक्षणं दिसू लागतात तेव्हा या आजारानं गंभीर रूप घेतलेलं असतं. हा आजार प्रगत टप्प्यात पोहोचलेला असतो. प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगलाच असं म्हटलं जातं. त्यामुळे कोणताही आजार होण्याआधी त्याची तपासणी करण्यास काय हरकत आहे.


प्रत्येक महिलेनं करायला हवी ते ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी. तुमची वयाच्या विशीत किंवा तिशीत असाल तर नियमित तपासणीत ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी जरूर करून घ्या. वेब एमडीनुसार विशी आणि तिशीत दर तीन महिन्यांनी आणि चाळीशीत प्रत्येक वर्षी मेमोग्राफी (Mammography) जरूर करा. 50 ते 70 वयापर्यंत दर दोन वर्षांनी तपासणी करू शकता. यामुळे ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं दिसण्याआधी म्हणजेच सुरुवातीच्या टप्प्यातच ब्रेस्ट कॅन्सरचं निदान होईल आणि उपचार करता येतील.


दुसरी तपासणी म्हणजे सर्व्हिकल कॅन्सरची (Cervical cancer). लैंगिक संबंधांमार्फत संक्रमित होणाऱ्या HPV मुळे हा कॅन्सर होतो. डॉक्टर तुम्हाला पॅप स्मिअर टेस्ट (Pap smear) करायला सांगू शकतात किंवा पॅप टेस्टसोबत HPV टेस्टही करायला सांगतात. लैंगिक संबंध ठेवत असाल तर ही टेस्ट जरूर करावी.


महिलांमध्ये सर्वसामान्यपणे दिसून येणारी समस्या म्हणजे हाडांची समस्या. त्यामुळे ऑस्टेओपोरोसिसची (Osteoporosi) तपासणीही जरूर करावी. यामध्ये हाडं ठिसूळ आणि कमकुवत होऊ लागतात. महिलांमध्ये हाडांमध्ये वेदना, थोडी दुखापत झाली तरी हाड मोडणं अशी समस्या दिसून येते. रजोनिवृत्ती आणि वाढत्या वयानुसार ही समस्या अधिक वाढते. यासाठी DXA करून घ्या. DXA म्हणजे dual energy X-ray absorptiometry हा खास प्रकारचा एक्स-रे असतो ज्यामध्ये हाडं किती मजबूत आहेत ते समजतात आणि त्याला हानी पोहोचण्याआधीच महिती मिळते.


महिलांना त्वचेच्या अनेक समस्या उद्भवत असतात. त्यापैकी काही लक्षणं त्वचेच्या कॅन्सरची (Skin Cancer) असू शकतात. त्यामुळे त्वचेतील बदलाकडे लक्ष ठेवा. त्वचेवर काहीही न लागता एखादी जखम झाल्या, चट्टा आल्यास किंवा फोड आल्यास त्यातील बदलाकडे लक्ष ठेवा आणि त्वचारोग तज्ज्ञांकडून नियमित तपासणी करून घ्या.


वाढत्या वयानुसार रक्तदाबाची (high blood pressure) समस्या उद्भवते. अयोग्य जीवनशैली आणि अतिवजन यामुळे हा धोका जास्त असतो. हाय ब्लड प्रेशरमुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. त्यामिळे रक्तदाबाची तपासणी जरूर करून घ्या. सामान्य रक्तदाब आहे 120/80 असतो आणि 130/80 पेक्षा अधिक रक्तदाब हा उच्च रक्तदाब असतो.


शरीरातील कोलेस्ट्रॉलची (cholesterol) पातळीही सातत्याने तपासत राहावी, कारण याची लक्षणं दिसत नाही आणि अचानक तुम्हाला हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. त्यामुळे ब्लड टेस्ट करून कोलेस्ट्रॉलची पातळी तपासून घ्यावी आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ते बदल करावेत.


बहुतेक लोकांना प्री-डायबेटिज असतो ही डायबेटिजच्या आधीची परिस्थिती आहे. त्यामुळे सातत्याने डायबेटिज (diabetes ) तपासत राहावा. डायबेटिजचा हृदय, किडनी, डोळ्यांवर परिणाम होतो. ब्लड टेस्ट करून डायबेटिजचं निदान होऊ शकतं. 100-125 ब्लड शुगर म्हणजे प्री-डायबेटिक आणि 126 किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे डायबेटिज. ब्लड टेस्टशिवाय A1C test आणि oral glucose tolerance test ही केली जाते. याबाबत डॉक्टरांशी बोलून घ्या.


असुरक्षित सेक्स, रक्त यामुळे एचआयव्हीचा (HIV) धोका असतो. प्रेग्नंट महिलेमार्फत तिच्या बाळालाही एचआयव्ही होऊ शकतो. कित्येक वर्षे त्याची लक्षणं दिसत नाहीत. मात्र जर तुम्ही ब्लड टेस्ट करत राहिलात तर एचआयव्हीचं निदान होऊ शकतं. शक्यतो एचआयव्ही होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घ्या.


कोलोरेक्टर कॅन्सर हा आतड्यांचा कॅन्सर आहे. इतर भागातही हा कॅन्सर पसरू शकतो. यासाठी कोलोनोस्कोपी (colonoscopy) करू शकता. आतड्यांमध्ये पॉलिप तयार होतं, जे एक प्रकारचं मांस असतं. हे कधी कधी कॅन्सरचं असू शकतं किंवा कॅन्सरचं नसूही शकतं. कोलोनोस्कोपी करून पॉलिप दिसल्यास डॉक्टर ते काढून टाकू शकतात आणि कॅन्सरचा धोका टाळता येतो. वयाच्या पन्नाशीनंतर ही टेस्ट जरूर करायला हवी.


ग्लॅकोमा म्हणजे ज्याला काचबिंदूही म्हणतात यामुळे अंधत्व येऊ शकतं. डोळ्यांतील नसांना हानी पोहोचत असते मात्र सुरुवातीला लक्षणं दिसत नाहीत. डोळ्यांची नियमित तपासणी केल्यानं हा धोका टाळता येऊ शकतो. तुमचं वय साठपेक्षा जास्त असेल, डोळ्याला दुखापत झाली असेल, स्टेरॉईड घेत असाल किंवा कुटुंबातील कुणाला ग्लॅकोमा असेल तर तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घ्या.