

रोज अंडी खाणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे की हानिकारक याविषयावर अद्याप कोणाचंही एकमत नाही. पण नुकत्याच केल्या गेलेल्या एका संशोधनात एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे.


संशोधनानुसार ज्या व्यक्ती आठवड्यातून तीन-चार अंडी खाते किंवा दररोज 300 मिलिग्रॅम कॉलेस्ट्रॉलचं सेवन करते अशा व्यक्तींना हृदयविकार आणि लवकर मृत्यू येण्याची शक्यता असते.


सीएनएनच्या वृत्तानुसार शिकागोमधील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी फिनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनच्या प्रिव्हेंटीव्ह डिपार्टमेंटचे प्रमुख व्हिक्टर झोंग सांगतात, अंड्यातील पिवळा बलक हा कॉलेस्ट्रॉलचा मुख्य स्रोत आहे.


एका मोठ्या अंड्यात जवळापास 186 मिलीग्रॅम कॉलेस्ट्रॉल असतं. संशोधकांनी या संशोधनासाठी सहा वेगवेगळ्या गटातील लोकांचा अभ्यास केला. ज्यात 29,000पेक्षा जास्त लोकांचा समावेश होता. या लोकांचं वय 17 वर्षांच्या आसपास होतं.


या संशोधनादरम्यान एकूण लोकांपैकी 5,400 लोकांना हृदयासंबंधीत समस्या असल्याचं दिसून आलं. संशोधनात दिसून आलं की, जे लोक दररोज 300 पेक्षा कॉलेस्ट्रॉलचं सेवन करतात त्यांना हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता 3.2 टक्के जास्त असते. तर 4.4 टक्के शक्यता वेळेआधी मृत्यू येण्याची असते.


मात्र या संशोधनावर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ब्रिटीश हार्ट फाउंडेशनची डाएटिशियन व्हिक्टोरिया टेलरच्या मते, या विषयावर मोठे संशोधन करण्याची गरज आहे. अशा प्रकारचं संशोधनाचा उद्देश समस्या आणि त्यांच्या पिणामांवर अभ्यास करण्याचा असल्याने त्यांच्या अभ्यासावर पूर्णतः विश्वास ठेवता येणार नाही.