

लग्नाआधी आणि साखरपुड्यानंतरचा काळ हा प्रत्येक जोडप्यासाठी फार खास असतो. या काळात भावी जोडीदारासोबत पुढील आयुष्याची स्वप्न रंगवली जातात. या काळात दोघांनाही एकमेकांसोबत जास्तीत जास्त काळ घालवावा असं सारखं वाटत असतं. मात्र या काळात काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्यायला हवी. नाही तर भविष्यात याचा त्रास होऊ शकतो.


सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दोघंही आयुष्याची नवी सुरुवात करणार आहात. त्यामुळे भूतकाळाला मागे सोडणंच केव्हाही चांगलं. त्या गोष्टी नव्याने उगळण्यात काही अर्थ नाही. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरल सर्व गोष्टी खऱ्या सांगायच्या असतील तर तुम्ही लग्नानंतर सांगू शकता.


प्रत्येक माणसाची काही ना काही कमतरता असते. तुमचीही अशी काही कमतरता असेल तर साखरपुडा झाल्यानंतर लगेच आपल्या पार्टनरला ती सांगू नका. एकत्र वेळ घालवल्यावर ती गोष्ट तशीही कळेल. प्रत्येक गोष्टीला योग्य ती वेळ द्या.


पार्टनरसोबत कधीही तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीबद्दल चर्चा करू नका. अनेकदा मुलं- मुली एकमेकांना पसंत करतात. पण त्यानंतर दोघांपैकी एकाची आर्थिक परिस्थिती अपेक्षेप्रमाणे नसेल तर नातं तुटू शकतं. त्यामुळे साखरपुड्याच्याआधीच सर्व गोष्टी स्पष्ट करणं केव्हाही चांगलं.


विशेष करून मुलींनी याकडे लक्ष देणं आवश्यक आहे की, अनेक मुलं एवढी व्यवहारिक नसतात की ते तुमच्या मित्र- मैत्रिणीं आणि तुमच्या स्वतंत्र्य विचारांचा त्यांना काही फरक पडत नाही. अनेकदा त्यांना तुमचा एखादा मित्रही आवडणार नाही. तसेच तुमचं मित्र- मैत्रिणींसोबत फिरणंही आवडणार नाही. या गोष्टी एक तर लग्न ठरण्याआधीच सांगा किंवा लग्न झाल्यानंतर सांगा.