

एकिकडे राज्यात कोरोनाची प्रकरणं झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट, नवा विषाणू, संसर्गाचा वाढलेला वेग अशा परिस्थितीत आता राज्याच्या संकटात वाढ झाली आहे.


राज्यात आता आरोग्य सेवासुविधा कमी पडू लागल्या आहेत. काही ठिकाणी बेड्स फूल झाले आहेत तर काही ठिकाणी लशीचे डोस संपले आहेत परिणामी लसीकरण बंद करण्याची वेळ आली आहे. हा प्रश्न एक-दोन जिल्ह्यांपुरता मर्यादित नाही. तर राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे.


सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेलसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. तर पुणे, मुंबई, नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक राहिला आहे. असे बरेच लसीकरण केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहेत.


मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील एकूण 120 लसीकरण केंद्रांपैकी 73 खासगी सेंटर्स आहेत. त्यापैकी 26 बंद झाले आहेत, तर आणखी 26 आज संध्याकाळी बंद होती. इतर 21 सेंटर्स लशीचा डोस संपल्यानंतर शुक्रवारपर्यंत बंद होती.


मुंबईतील गोरेगाव नेस्को लसीकरण केंद्रावर तर लांबलचक रांग लागली आहे. कुणी दुसरं लसीकरण केंद्र बंद झालं म्हणून आलं आहे तर कुणी लस संपेल त्याआधीच घ्यायला आलं. या लसीकरण केंद्रावर दररोज 5000 च्या आसपास लसीकरण केलं जातं पण आज दुपारी 2 च्या आतच तब्बल 3000 जणांना लस देण्यात आली होती.


तर मुंबई शहरातील महापालिकेच्या कोरोना सेंटरमधील आयसीयू बेड्स फूल झाले आहेत, अशी माहिती कोरोना वॉररूममधून मिळाली आहे.


औरंगाबादमध्ये केवळ दीड दिवस पुरेल एवढीच लस सध्या उपलब्ध आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात विविध सेंटरवर 58 हजार लस आहेत. मुख्य साठ्याच्या जागी सध्या लस नाही. उद्या संध्याकाळपर्यंत लस पोहोचली नाही तर जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्र बंद करावे लागतील अशी शक्यता आहे.


अहमदनगरमध्ये रुग्णवाढ इतक्या प्रमाणात झाली आहे की, अनेक ठिकाणी बेड आणि रेमडेसिवीर औषधही मिळेना झालं आहे.


नांदेड जिल्ह्यात दोन ते अडीच दिवस पुरेल इतका लशीचा साठा आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 2 लाख 38 हजार 530 लशी उपलब्ध झाल्यात . त्यापैकी 1 लाख 95 हजार लोकांना दिल्या आहेत. सध्या 47 ते 50 हजार लशी उपलब्ध आहेत . जिल्ह्यातील 51 लसीकरण केंद्रावर दररोज 20 हजार डोस दिले जातात आणखी एक ते सव्वा लाख लशीची मागणी करण्यात आली आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आज एक दिवस पुरेल इतकीच कोव्हिड लस उपलब्ध आहे. जिल्हा स्तरावरच लशीचा तुटवडा असल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत खेड तालुक्यात केवळ दहा टक्केच लसीकरण झालं असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.