

काही कोरोना रुग्णांमध्ये लक्षणं दिसत आहेत तर काही रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत. लक्षणं न दिसलेल्या रुग्णांच्या शरीरावरही कोरोना दुष्परिणाम करत असल्याचं याआधी काही अभ्यासांमध्ये दिसून आलं आहे.


आता आणखी एक संशोधन करण्यात आलं, ज्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. लक्षणं असलेल्या रुग्णांच्या तुलनेत लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या शरीरात कोरोनाव्हायरसचं प्रमाण जास्त असल्याचं संशोधकांना दिसून आलं.


तेलंगणातील 200 अधिक कोव्हिड-19 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. हैदराबादच्या सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स (CDFD) च्या शास्त्रज्ञांनी इतर शास्त्रज्ञांसह मिळून हा अभ्यास केला. लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या प्राथमिक आणि द्वितीय संपर्काची माहिती मिळून त्यांची तपासणी करून त्यांना देखरेखीत ठेवलं.


अभ्यासात दिसून आलं की, लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या तुलनेत सीटी मूल्य अधिक आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये व्हायरस कमी प्रमाणात आहे. याचाच अर्थ व्हायरस लोड कमी आहे.


सीडीएफडीच्या लॅबोरेटरी ऑफ मॉलिक्युलर ऑन्कोलॉजीचे (Laboratory of Molecular Oncology) मुरली धरण बश्याम यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, लक्षण विरहित रुग्णांपासून संक्रमणाची शक्यता किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, त्यांच्यामार्फत रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असलेल्यांना संक्रमण झालं तर मृत्यूदर वाढण्याचा धोका अधिक असतो.