कोरोनाव्हायरसने जगभर थैमान घातलं आहे, त्याला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये लशींचं संशोधन सुरू आहे. काही औषध कंपन्या आपली लस याच वर्षात येण्याचा दावा करत आहेत. पुढील वर्षापर्यंत कोरोनाची लस मिळेल अशी आशा आहे. दरम्यान जगातील कोणत्या लशीची सध्या काय स्थिती आहे ते पाहू. जेणेकरून कोणती लस सर्वात आधी उपलब्ध होईल याचा अंदाज येईल. (प्रतीकात्मक फोटो : Pixabay)
कोरोना व्हॅक्सिनचा निर्मितीमधील मोठा भाग हा भारतात तयार होण्याची शक्यता असल्याचं बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रमुख मार्क सुजमन यांनी सांगितलं होतं. भारत लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत असून पुढील वर्षापर्यंत एखादी लस बाजारात येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मजबूत खासगी क्षेत्रामुळे हे शक्य असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर भारतातील मंत्र्यांनीदेखील फेब्रुवारीमध्ये लस बाजारात येण्याचा विश्वास व्यक्त केला होता.
अमेरिकेमध्ये लशीची अधिकृत घोषणा करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाई नसल्याचं दिसून येत आहे. पण या वर्षीच्या शेवटपर्यंत अमेरिकेत पर्यायी, सुरक्षित आणि उत्तम अशी लस येण्याची अपेक्षा अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेतील हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेस सेक्रेटरी अलेक्स एजार यांनी या वर्षीच्या शेवटपर्यंत नागरिकांना एक किंवा दोन लशी मिळतील, यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं सांगितलं.
ब्राझीलमध्ये लशीची चाचणी करत असताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य संस्था Anvisa ने दिली आहे. ही लस अॅस्ट्राझेनका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ विकसित करत आहेत. पण यानंतर देखील या लशीची चाचणी सुरू राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. बाजारात ही लस कधी येणार आहे याबद्दल मात्र अधिकृत माहिती दिलेली नाही.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये रशियाने आपल्या Sputnik-V या लशीची घोषणा देखील केली होती. यावेळी या लशीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीचा अहवालही जारी करण्यात आला नाही आणि आता या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्याची माहिती जर्नल लॅसेंटने दिली आहे. आता तिसऱ्या टप्यातील 10 हजार स्वयंसेवकांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. त्याचबरोबर भारतात देखील या लशीचं ट्रायल घेतलं जाणार आहे.