पावसाळा आला म्हणजे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि व्हायरल तापासारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीमुळे देशात हाहाकार माजला आहे. ही चिंतेची बाब आहे. खरंतर व्हायरल ताप येणं आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये फारसा फरक नाहीये. म्हणूनच, कोरोना संसर्ग अधिक वेगानं वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळा येणार म्हटल्यामुळे यंदा लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे.
पावसाचा कोरोना विषाणूवर काही परिणाम होत नाही. महत्त्वाचं म्हणजे कोरोना विषाणू हा हवेत नाही ही बाब लक्षात घ्यायला हवी. जर तुम्हाला कोरोना टाळायचा असेल तर त्यावर एकच उपचार आहे आणि तो म्हणजे वारंवार हात धुण्याची सवय लावणं आणि स्वच्छतेकडे लक्ष देणं. आपलं आरोग्य नीट असणं हीच कोरोनाला संपवण्याची पहिली लस आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर घाबरण्यापेक्षा आरोग्याची नीट काळजी घ्या.
पावसाळ्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत घरातदेखील चप्पल घालण्याचा प्रयत्न करा. पण घरातली आणि बाहेर घालण्याची चप्पल वेगळी ठेवा. वेळोवेळी घर, घरातल्या वस्तू, दारं-खिडक्या स्वच्छ ठेवा, घराचा मजला साफ ठेवा आणि दारे आणि खिडक्या खुल्या ठेवण्याचा प्रयत्न करा.
पावसाळ्या असंख्य साथीचे रोग पसरतात. त्यामुळे हा एक आजारपणाचा मौसम आहे. या हंगामात, बॅक्टेरियाची संख्या वेगानं वाढत असते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, व्हायरल तापासारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यात शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज आहे. पण जर पावसाळ्यात आपली रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर मात्र कोरोना विषाणू होण्याचा धोका वाढतो.
शोधनानुसार, कोरोना व्हायरस बर्याच दिवस कपड्यांवर राहू शकतो. त्यामुळे जसे आपण रोज कपडे धुतो तसं रेनकोटही धुणं महत्त्लाचं आहे. त्यानंतर त्याला हवेत सुकवून पुन्हा घालता येईल. पण जर तुमचा मास्क ओला झाला असेल तर तो काढून टाकणंच योग्य आहे. फक्त पावसाच्या पाण्यामुळे नाही तर बर्याच वेळा मास्क ओला होतो. पण अशावेळी त्वरित मास्क काढून टाकला पाहिजे आणि दुसरा मास्क वापरला पाहिजे.
पावसाळ्यात वाढणाऱ्या आर्द्रतेवर तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. आयआयटी बॉम्बेच्या म्हणण्यानुसार, वाढत्या आर्द्रतेमुळे कोरोना विषाणू आणखी धोकादायक होईल. तर काही तज्ज्ञांच म्हणणं आहे की, आर्द्रतेमुळे कोरोनाचा संसर्गाचा धोका कमी होईल. खोकल्यामुळे आणि शिंकल्यामुळे थेंब बाहेर पडतात. आर्द्रतेमुळे हे थेंब मोठे होतात आणि खाली पडतात. याचा तसा शरीरावर परिणाम कमी होतो.
पावसाळ्यात कोरोनासारख्याच काय इतरदेखील विषाणूला रोखण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी जीवनसत्त्वं ए, बी, सी, डी, लोहयुक्त पदार्थ जास्त असलेली फळं खावीत. त्याचबरोबर जेवणात लोणचं, लिंबू, गाजर, संत्री, डाळिंब, अक्रोड, बदाम, शेंगदाणे, लसूण आणि पालक अशा पदार्थांचा समावेश असावा.