उणे 83 अंश सेल्सिअस तापमानातही इथे मजेत राहतात लोक; पाहा जगातल्या 8 कूल शहरांतलं चित्र
जगातील सर्वाधिक थंड शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियातील याकुत्स्क इथे उणे (-83) अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. फोटोग्राफर्सनी आणि मानसतज्ज्ञांनी या टोकाच्या हवामानाचा इथल्या लोकांच्या भावनांवरही काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.


यंदा थंडी अधिक असेल असा अंदाज यापूर्वीच हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जगातील अनेक देशांमध्ये हाडं गोठवणारी थंडी असते, त्या तुलनेत आपल्याकडे थंडीचे प्रमाण कमी असते. असंही एक शहर आहे जिथे उणे 83 अंशापर्यंत तापमान घसरतं. तिथेही लोकवस्ती आहे. (सांकेतिक फोटो : Pixabay)


मिनीसोटातील इंटरनॅशनल फाल्स नावाचे शहर इतकं थंड आहे की त्याला अमेरिकेचं आइसबर्ग म्हणून ओळखलं जातं. येथे विक्रमी -55 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. येथील थंडीचा अंदाज या भागात होणाऱ्या सरासरी हिमवर्षावावरुन (येथे अंदाजे 71.6 इंच हिमवृष्टी होते) व्यक्त केला जातो. ही आकडेवारी अमेरिकेतील अन्य भागांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. एवढी कडाक्याची थंडी असूनही हे शहर पर्यटकांचे नंदनवन समजले जाते. येथे उन्हाळ्यात बर्फातील मासेमारी तर कॅनडाच्या सीमेलगत असल्याने क्राॅसकंट्री स्किईंग केले जाते. (सांकेतिक फोटो)


कझाकिस्तानमधील अस्ताना शहरात जानेवारीत सरासरी तापमान -14 अंश सेल्सिअस राहते. अतिथंडीमुळे येथील तापमानाचा पारा घसरुन -61 अंश सेल्सिअस नोंदला गेला होता. अतिशय सुबक घरे आणि मशिदींचे शहर म्हणून ओळख असलेल्या अस्तानातील रस्ते अतिथंडीमुळे ओस पडले होते. येथील नद्या नोव्हेंबर ते एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत गोठलेल्या असतात. त्यानंतर उन्हाळा सुरू होताच त्या प्रवाही होतात. (सांकेतिक फोटो : Pixabay)


उलान बातर हे मंगोलियातील सर्वात मोठे आणि राजधानीचे शहर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 4430 फूट उंचीवर असलेले हे शहर सगळ्यात थंड राजधानीचे शहर म्हणून ओळखले जाते. येथे जानेवारीत सरासरी तापमान – 24 अंश सेल्सिअस असते. ते -50 अंश सेल्सिअसपर्यंत घटते. येथील नागरिकांसाठी थंडीचा अर्थ रक्त गोठवणारा गारठा असा आहे. वन संपदा आणि वास्तू संस्कृती ही या शहराची ओळख. येथील तिबेटी शैलीतील बौध्द मंदिरे पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. (सांकेतिक फोटो : The daily beast)


कॅनडातील यलोनाईफ हे शहर हिम वादळांसाठी ओळखले जाते. कॅनडातील हा भाग सर्वाधिक थंड समजला जातो. येथे जानेवारीत सरसरी तापमान -27 अंश सेल्सिअस असते, त्यात -60 अंश सेल्सिअसपर्यंत घट होते. खरे तर मजेदार गोष्ट अशी आहे की उन्हाळ्यात सर्वाधिक उजळून निघणारे शहर म्हणून कॅनडातील यलोनाईफची ओळख आहे. अतिथंडी आणि कठीण बर्फामुळे हे शहर साहसप्रेमींसाठी मक्का म्हणून ओळखले जाते. (सांकेतिक फोटो : Pxhere)


: रशियातील नॉरिल्स्क हे जगाच्या उत्तर टोकाला वसलेले शहर आहे. येथील लोकसंख्या सुमारे 1 लाख आहे. शहरात अनेक सुंदर संग्रहालये आणि पर्यटनस्थळे आहेत. मात्र अतिथंड हवामानामुळे येथे पर्यटनाला अपेक्षित प्रमाणात चालना मिळत नाही. नॉरिल्स्कमध्ये सरासरी तापमान -30 अंश सेल्सिअस असते. मात्र हिवाळ्यात ते -63 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. या भागात कोळसा खाणी आहेत. त्यामुळे हिवाळ्यात हे शहर काळ्या-लाल रंगाच्या धुक्याने झाकोळून जाते. त्यामुळे धोका लक्षात घेत रशिया सरकारने 2001 पासून या शहरात पर्यटनाला बंदी घातली आहे. (सांकेतिक फोटो: getarchieve)


रशियातील याकुत्स्क हे जगातील सर्वात थंड शहर म्हणून ओळखले जाते. असे असताना देखील येथे नागरिक वास्तव्य करतात. येथे -83 अंश सेल्सिअस तापमानाची यापूर्वी नोंद झालेली आहे. येथील प्रत्येक गोष्ट ही हिमाच्छादित आणि धुक्याखाली झाकून जाते. लीना नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहरात मासे दुकानांसमोर मांडले जातात आणि विशेष म्हणजे अतिगारठ्यामुळे ते महिनाभर ताजे राहतात. येथील लोक अतिथंडीतही कसे राहतात, तसेच त्यामुळे त्यांच्यातील भावनिक व्यवहारात काही बदल होतो का हे अभ्यासण्यासाठी जिनिव्हातील (Geneva) फोटोग्राफर स्टिव्ह लन्कर (Steev Luncker) याने येथे नुकतीच भेट दिली. परंतु, अतिगारठ्यामुळे स्टिव्ह बराच काळ खोलीबाहेर पडू शकला नाही. त्यानंतर त्याने अतिथंडीचा माणसाच्या भावनांवर कोणताही परिणाम होत नाही असा निष्कर्ष त्याने मांडला. (सांकेतिक फोटो:Pixabay)


ओइमाकॅन हे रशियातील (Russia) अजून एक थंड (Cold) शहर. हे शहर सायबेरियातील (Siberia) हिमाच्छादित खोऱ्यानजीक वसले आहे. हिवाळ्यात बर्फामुळे येथील जमीन इतकी कठीण होते की जर एखाद्याचा मृत्यू झाला तर दफनविधी करतानाही मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. सलग दोन ते तीन दिवस खोदकाम केल्यावर दफनविधी करणे शक्य होते. जानेवारीत येथील सरासरी तापमान -50 अंश सेल्सिअस असते. यापूर्वी येथे सर्वात कमी तापमान -71.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. जुलैत येथे उन्हाळा सुरु होतो. या काळात येथे दिवसाचे तापमान 18.7 अंश सेल्सिअस असते. या कालावधीतच येथील लोक व्यायामासाठी किंवा फिरण्यासाठी बाहेर पडतात. बाकी अन्य वेळी थोडी हालचाल केली तर दम लागून मृत्यू होण्याची शक्यता असते. (सांकेतिक फोटो : Pixabay)