

कोरोनाव्हायरसशी (Corona Virus) संपूर्ण जग लढतं आहे, अशात सर्वांना कोरोना लस (Corona Vaccine) कधी येईल याची प्रतीक्षा आहे. मोदी सरकारही लवकरात लवकर कोरोना लस आणण्यासाठी धडपड करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात ज्या औषध कंपनीनं कोरोना लस विकसित केली आहे, त्यांच्यामार्फत कोरोना लशींचं ट्रायल सुरू आहे, अशा कंपन्यांना स्वतः भेट देऊन लशीची प्रक्रिया समजून घेणार आणि सुरक्षिततेची खात्री करून घेणार आहेत.


वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, ब्राझीलमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 62 लाखांपेक्षा जास्त प्रकरणं आहेत. दीड लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूबाबत ब्राझील अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर असलेला देश आहे. असं असताना कोरोनामुक्त झालेले ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी कोरोना लशींवर अविश्वास दाखवला आहे. आपण लस घेणार नाही, असं त्यांनी गुरुवारी स्पष्ट केलं आहे.


भारतात एका मंत्र्यानंही ट्रायलमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत कोरोनाची लस घेतली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील लस लवकर आणण्याच्या तयारीत आहेत. असं असताना ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी मात्र कोरोना लस घेण्यास नकार दिला आहे.


रॉयटर्सच्या वृत्तानुसार बोलसोनारो यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लशीकरण कार्यक्रमावरदेखील प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. बोलसोनारो म्हणाले, मी कोरोना लस घेणार नाही हा माझा अधिकार आहे.


बोलसोनारो स्वत: कोव्हिड-19 चे शिकार झाले होते. जुलैमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह असतानादेखील बोलसोनारो म्हणाले होते, घाबरण्याची काही गरज नाही. हे जीवन आहे आणि जीवनात असं सुरुच असतं. माझ्या आयुष्यासाठी मी देवाचे आभार मानतो. मला देवानं जे काम दिलं आहे, त्यामुळे ब्राझीलसारख्या महान देशाचं भविष्य ठरेल.


स्वतः लस घेण्यास त्यांनी नकार तर दिलाच, मात्र ब्राझीलच्या लोकांनाही लस देण्याची गरज नाही, असं ते म्हणाले. ऑक्टोबरमध्येदेखील त्यांनी ट्विटरमार्फत लशीच्या प्रक्रियेची खिल्ली उडवली होती. त्यावेळीदेखील या लशीची गरज फक्त आपल्या कुत्र्यासाठी असल्याचं ते म्हणाले होते.