कोरोना लस पुढच्या वर्षीय उपलब्ध होईल. पण ती सर्वांनाच मिळणार नाही. सुरुवातीला सरकारनं ठरवलेल्या प्राधान्यक्रमानुसारच कोरोना लशीकरण केलं जाणार आहे. पण मग इतर लोकांचं काय ज्यांना कोरोना लस मिळणार नाही, त्यांचा कोरोनापासून बचाव कसा होणार, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे आणि अशाच लोकांसाठी आता कोरोनावरील औषध तयार झालं आहे.
आज तकनं बीबीसीच्या रिपोर्टचा हवाला देत या औषधाबाबत वृत्त दिलं आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन हॉस्पिटलमध्ये (UCLH) ट्रायल सुरू करण्यात आलं आहे. जे लोक कोरोना रुग्णांच्या संपर्कात आले आहेत अशा लोकांवर हे ट्रायल होतं आहे. पहिल्या टप्प्यातील ट्रायलमध्ये 10 लोकांना अँटिबॉडीज देण्यात आल्या आहेत. दोन पद्धतीच्या अँटिबॉडीज वापरल्यास कोरोनापासून अधिक सुरक्षा मिळते हा हेदेखील या ट्रायलमध्ये तपासलं जातं आहे.
लस दिल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यात भरपूर कालावधी लागतो. पण या अँटिबॉडीज कोरोनाव्हायरसला तात्काळ रोखतील अशी आशा संशोधकांनी व्यक्त केली आहे. कोरोनापासन तात्काळ बचावाचा उपाय असल्याचं सांगितलं जातं आहे. तसंच या अँटिबॉडीजमुळे एक वर्षापर्यंत कोरोनापासून सुरक्षा मिळेल असंही सांगितलं जातं आहे.