जगात अनेक जाती-धर्मांचे लोक राहतात. भारतातही अनेक जाती-जमाती अस्तित्वात आहेत; मात्र अशी एक जमात आहे, जी अजूनही पाषाणयुगाप्रमाणे जगते, असं म्हणायला हरकत नाही. भारतातल्या अंदमान-निकोबार बेटांवर (Andaman-Nicobar Islands) जारवा (Jarwa) ही आदिवासी जमात आजही वास्तव्य करून आहे. या जमातीच्या नागरिकांमध्ये गोऱ्या बाळाचा जन्म झाल्यास त्याला मारून टाकलं जातं.
जारवा जमातीत आणखीही काही विचित्र प्रथा पाळल्या जातात. त्यातली एक म्हणजे एखाद्या स्त्रीनं सुंदर, गोऱ्या बाळाला जन्म दिला, तर त्या बाळाला लगेचच मारून टाकलं जातं. त्याचं कारण जारवा जमातीतली माणसं काळी असतात. आफ्रिकेत मूळ असल्यानं त्यांचा रंग काळाच असतो. मग गोऱ्या रंगाचं बाळ म्हणजे इतर जमातीतलं किंवा समुदायाचं असू शकतं, असा समज करून त्याला मारलं जातं. या जमातीत बाळाचा जन्म झाल्यावर जमातीतल्या सर्व महिला त्याला स्तनपान देतात. यामुळे समुदाय एकत्र राहण्यास मदत होते, असं त्यांचं म्हणणं आहे.
इतकंच नाही, तर एखादी स्त्री विधवा झाली, तरी तिच्या मुलांना मारून टाकलं जातं. या जमातीची माणसं अजूनही इतर माणसांमध्ये मिसळत नाहीत. या विचित्र प्रथांमुळेच कदाचित जारवा जमात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पर्यटकांनाही जारवा जमातीच्या माणसांना भेटण्यास मनाई असते. त्यांचे फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ अपलोड करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.