लोणावळा- लोणावळा हे पुणे जिल्ह्यात असून प्रमुख हिल स्टेशन आहे. पावसाळ्यामध्ये लोणावळ्याचे सौंदर्य आणखी खुलतं. देशभरातून अनेक पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक लोणावळ्यात येत असतात. सह्याद्रीच्या उंच डोंगररांगा, खोल दऱ्या, धबधबे, विपुल वनसंपदा, किल्ले, लेणी यांसाठी लोणावळा प्रसिद्ध आहे. थीम पार्क, कॅम्पिंग पॅराग्लायडिंग बंजी जंपिंग यासारख्या ऍक्टिव्हिटीमुळे लोणावळा पर्यटकांमध्ये प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू झाले आहे.
महाबळेश्वर- महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्र सपाटीपासून सुमारे ४५०० फुट उंचीवर वसलेले आहे. येथील हिरवंगार जंगल, सुंदर बगीचे, वेण्णा लेक, धबधबे, श्वास रोखायला लावणारी दृश्ये इत्यादीमुळे पर्यटक मंत्रमुग्ध होतात. येथील ऑर्थर सीट पॉईंट, इको पॉईंट, वेण्णा लेक, फॉकलंड पॉईंट, लिंगमळा धबधबा, बॉम्बे पॉईंट, श्री क्षेत्र महाबळेश्वर इत्यादी अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
पाचगणी- पाचगणी हे महाबळेश्वरपासून जवळच असलेलं आणखी एक थंड हवेचे ठिकाण. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लॅंड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत.