

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना फिरायला कुठे घेऊन जायचं हा प्रश्न असतो. मुलांचा आणि वन्य प्रेमींचा ओढा कायम प्राणी पक्ष्यांकडे असतो. यंदाच्या सुट्टीत तुम्ही मुलांसोबत अभयारण्याची सफर करायला जाऊ शकता. आपल्या महाराष्ट्रातच खूप सुंदर अशा प्रकारचे अभयारण्य आहेत. त्यातील या निवडक 10 अभयारण्यांची सफर तर तुम्ही नक्कीच करायला हवी.


नाशिक- निफाडमधील नांदुर मध्यमेश्वर अभयारण्य हे वेगवेगळ्या पक्षांच्या प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. गोदावरी-कादवा नदीच्या संगमाच्या प्रवाहावर नांदुर मध्यमेश्वर हे धरण बांधण्यात आलं आहे. इथे नर्तक, धनेश, करकोचे, बगळा असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथे पहायला मिळतात. पक्षाची शाळा असं मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याला एकदा भेट द्यायलाच हवी.


पुणे- भीमाशंकर अभयारण्य हे 20 पर्यटन स्थळांपैकी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. निरनिराळ्या प्रकारच्या दुर्मीळ औषधी वनस्पती, प्राणी आणि सूर्यास्तासाठी प्रसिद्ध असलेला डोंगरकडा हे इथल वैशिष्ट. भीमाशंकर अभयारण्याचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट म्हणजे शेकरू खार इथे तुम्हाला पहायला मिळते. सांबर, हरीण, साळींदर असे छोटे मोठे प्राणी दिसतात.


चंद्रपूर- ताडोबा अभयारण्यातील आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे अंधारी व्याघ्र प्रकल्प. ताडोबा अभयारण्यात सर्व प्रकारचे प्राणी पहायला मिळतात मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिंजऱ्यात न ठेवलेले वाघ या अंधारी व्याघ्र प्रकल्पात पहायला मिळतात. इथे सफारीसाठी मोकळ्या जीपची सुविधाही आहे.


अमरावती- जैवविविधतेसाठी महाराष्ट्रात चौथ्या स्थानावर असलेलं अभयारण्य म्हणून मेळघाटाचा उल्लेख केला जातो. मेळघाट व्याघ्र प्रकल्पही आहे. सातपुडा पर्वतरांगामधील जंगल, प्राणी, पक्षी आणि वाघ पाहण्यासाठी या अभयारण्याची सफर नक्की करायला हवी.


रायगड- कर्नाळा अभयारण्यात एका वर्षात साधारण 125 ते 150 जातींचे पक्षी आढळतात. मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फलाय कॅचर,भोरडया, तांबट, कोतवाल,पांढर्या पाठीची गिधाडे, दयाळ शाहीनससाणा, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी आढळतात.


सातारा- कोयना अभयारण्य/ जंगल- पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात घनदाट जंगलांमध्ये कोयना अभयारण्याचा समावेश होतो. इतिहासात हे जंगल जावळीचं खोरं म्हणून प्रसिद्ध होते. इथे तरस खोकड, ऊदमांजरे, साळिंदर, पिसोरी, भेकर, अस्वल, सापांच्या विविध जाती इथे पाहायला मिळतात.


गोंदिया-भंडारा दोन्ही जिल्ह्यांच्या मधोमध नागझिरा अभयारण्य आहे. या अभयारण्यात वीज पुरवठा नाही आणि हेच इथलं सर्वात मोठं वैशिष्ट्यं आहे. 200 पेक्षा अधिक पक्षांच्या जाती, प्राणी इथे तुम्हाला पहायला मिळतात. वाघासोबत बिबळा रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, चौशिंगा, नीलगाय, चितळ, सांबर, काकर, रानमांजर, ऊदमांजर, ताडमांजर, उडणखार, सर्प गरुड, मत्स्य गरुड, टकाचोर, खाटीक, राखी धनेश, नवरंग, कोतवाल इत्यादी अनेक प्राणी आढतात


पुण्यापासून जवळ ताम्हिणी अभयारण्यात सस्तन प्राण्यांच्या 28 प्रजाती आहेत. स्थानिक पक्षांच्या 12 प्रजातींसह येथे 150 प्रकारचे पक्षी तुम्हाला इथे पाहता येतात. फुलपाखरांच्या वेगवेगळ्या प्रजाती इथे आहेत. ताम्हिणी अभयारण्य म्हणजे फुलपाखरांचं निवासस्थान असा उल्लेख केला जातो. इथे 72 प्रकारची फुलपाखरं आहेत. 18 प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि 33 प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती पाहायला मिळतात .


कोल्हापूर राधानगरी अभयारण्य- निसर्गाच्या सानिध्यात भटकायचे असेल तर या अभयारण्यात जायलाच हवं. या अभयारण्याचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे.पक्षी निरीक्षणासाठी राधानगरी अभयारण्य सर्वात उत्तम ठिकाण आहे. फक्त पश्चिम घाटात आढळणाऱ्या पक्ष्यांपकी १० प्रजातींचे पक्षी येथे आढळतात.