

भुजंगासन - भुजंग म्हणजे साप, या आसनात शरीराचा आकार सापासारखा होतो म्हणूनच या आसनाला भुजंगासन असं म्हटलं जातं. आधी पोटावर झोपावे. दोन्ही पायांना जोडावे. हनुवटी जमिनीवर ठेवावी. आणि हळूहळू मान आणि पाठ वर उचलावी. नजर आकाशाकडे आणि हात ताठ ठेवावेत. लाभ - या आसनामुळे गळा, पोट, पाठ, आणि कंबरेचा चांगला व्यायाम होतो. यामुळे आपल्या पित्ताशयाची क्रियात्मकता वाढते. पचन शक्ती वाढते. पोटावरची चरबीही कमी होते.


गोमुखासन - उजव्या पायाची टांच शिवणीला लावा. दुसरा पाय त्यावरून गुडघ्यावर गुडघा येईल अशा त-हेने ठेवा. डावा हात वर करा आणि कोपऱ्यात वाकवून पाठिमागे घ्या तसंच डावे कोपरे डोक्यामागे वरच्या दिशेने राहील उजवा हात उजवीकडून पाठीमागे घ्या आणि तळहात वर सरकून दोन्ही हाताची बोटे एकमेकात घट्ट पकडा. लाभ - खांदे, मान, दंडाच्या स्नांयुंवर ताण पडल्याने बळकटी येते. मानेचे विकार आणि पाठदुखी थांबते. मन प्रसन्न आणि ताजेतवानं होतं. एकाग्रता आणि मन:शांती लाभते.


शवासन - दोन्ही पायात अंतर ठेऊन पाठीवर झोपा. दोन्ही हात शरीरापासून सहा इंच लांब आणि मोकळे ठेवावेत. मान सरळ आणि डोळे बंद ठेवावे. संपूर्ण शरीर सैल सोडून श्वासावर लक्ष केंद्रीत करा. लाभ - या आसनात मन शरीराशी जोडलं गेलेलं असतं. त्यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारचे बाहेरचे विचार उत्पन्न होत नाहीत. शरीराचा सगळा थकवा दूर होतो.


उष्ट्रासन - हे असन करताना शरीराची स्थिती ही उंटाच्या आकारासारखी होते. म्हणून या आसनाना उष्ट्रासन असं म्हणतात. सुरवातीला वज्रासनात बसा. त्यानंतर गुडघ्यांवर उभे राहा. सहाजिकच पाय मागे रहातील. दोन्ही हात कानाला लावून मागे घ्या. शरीराचा पुढील भाग हळूहळू मागे झुकवा. त्यानंतर हातही पूर्णपणे मागे न्या आणि दोन्ही हातांनी टाच पकडण्याचा प्रयत्न करा. मानही मागे वळवा आणि डोकंही मागे न्या. लाभ - गुडघेदुखी, किडनी, लिव्हर, फुप्पुसे, मानेचा भाग यांना व्यायाम मिळतो. या आसनामुळे शरीरात स्फूर्ती निर्माण होते. या आसनामुळे पोटाचे आजार जसे बद्धकोष्ट, अपचन, एसिडिटी दूर होते.


ताडासन - ताडासन करताना शरीराची स्थिती ताडीच्या झाडाप्रमाणे ताठ असते, त्यामुळे या आसनाला ताडासन असं म्हणतात. सरळ उभं राहून पायाची बोटे आणि पंजे समांतर ठेवून हात सरळ कमरेला लावून उभं राहावं. त्यानंतर हळू हळू हात खांद्यापर्यंत आणून त्यांना डोक्याच्यावर नेत केवळ तळ पायांवर उभे राहावे. हाताच्या पंज्यांना विरुद्ध दिशेने नेऊन वर ओढावे.
लाभ - पायांचे स्नायू आणि पंजे मजबूत होतात. छाती आणि पोट यांच्यावर ताण पडल्याने आजार दूर होतात. मुलांच्या शारीरिक वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे.