अपघातग्रस्त विमान MI17 V5 हे भारतीय हवाई दलाचे अत्यंत शक्तिशाली हेलिकॉप्टर आहे. हेलिकॉप्टर MI17 V5 आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हे हेलिकॉप्टर हवाई दलाच्या अनेक महत्त्वाच्या ऑपरेशन्सचाही एक भाग आहे. भारतीय हवाई दलाचे Mi-17V-5 हेलिकॉप्टर हे खासकरुन लष्करी वाहतुकीसाठी वापरले जाते. रशिया या वाहनांची निर्मिती करतो. हे हेलिकॉप्टरच्या Mi-8/17 कुटुंबाचा भाग आहेत.
या हेलिकॉप्टरचा कमाल वेग 250 किमी/तास आहे. ते कमाल 6000 मीटर उंचीपर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहे. एकदा इंधन भरल्यानंतर ते 580 किमी जाऊ शकते. दोन सहायक इंधन टाक्या भरल्यानंतर ते 1065 किमी अंतर कापू शकते. हेलिकॉप्टर जास्तीत जास्त 13,000 किलो वजनासह उड्डाण करू शकते. याच्या मदतीने सुमारे 36 सशस्त्र सैनिक नेले जाऊ शकतात.
हेलिकॉप्टर अनेक प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज आहे. यात 5 क्षेपणास्त्र, एस-8 रॉकेट, एक 23 मिमी मशीनगन आणि पीकेटी मशीनगनसह 8 फायरिंग पोस्ट आहेत. या पोस्टचा उपयोग शस्त्रे लक्ष्यापर्यंत भेदण्यासाठी केला जातो. यातील तंत्रज्ञानामुळे रात्रीही सहज कारवाई करता येते. हे विमान भारतीय हवाई दलाच्या अनेक बचाव आणि मदत कार्यातही खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी एनएसजी कमांडो या हेलिकॉप्टरमधून कुलाब्यात उतरले होते. अहवालानुसार, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लॉन्च पॅड नष्ट करण्यासाठी सप्टेंबर 2016 मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्येही त्यांचा वापर करण्यात आला होता. भारताकडे सध्या 150 हून अधिक Mi-17 V5 हेलिकॉप्टर आहेत. यातील शेवटचे विमान रशियाने जानेवारी 2016 मध्ये भारताला सुपूर्द केले होते.