

बॉलिवूडची रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या राजकारणात प्रवेश केल्यामुळं खूपच चर्चेत आहेत. उर्मिला यांनी बुधवारी (27 मार्च) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उत्तर मुंबईतून उर्मिलांना काँग्रेसकडून तिकीट मिळू शकते अशी चर्चा आहे. काँग्रेस प्रवेशाच्यावेळी पारंपारिक कपड्यात दिसलेल्या उर्मिला यांनी एकेकाळी आपल्या हॉट अवतारानं बॉलिवूड गाजवलं. पाहूयात राजकारणात येण्यापूर्वी कशी होती उर्मिला यांची बॉलिवूड कारकिर्द...


आज बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या उर्मिला मातोंडकर बॉलिवूडची रंगीला गर्ल म्हणून ओळखल्या जातात. 80 आणि 90च्या दशकात उर्मिला बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री होत्या.


राजकारणात नवख्या असलेल्या उर्मिला यांनी आपल्या सिने कारकिर्दीची सुरूवात मात्र एक बालकलाकार म्हणून केली होती. त्यांनी 1980 मध्ये बालकलाकार म्हणून 'झाकोळ' या मराठी सिनेमात काम केलं.


मराठी नंतर 'नरसिंह' या हिंदी सिनेमातून मुख्य नायिका म्हणून त्यांनी बॉलिवूड पदार्पण केलं. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती 1995 मध्ये आलेल्या 'रंगीला' सिनेमामुळे. या सिनेमाच्या नावावरून त्यांना 'रंगीला गर्ल' म्हटलं जाऊ लागलं आणि नंतर हेच नाव त्यांची बॉलिवूडमधील ओळख बनलं.


1998 मध्ये आलेल्या 'चायना गेट'ची कथा तेवढीशी दमदार नसली तरी हा सिनेमा उर्मिलांच्या 'छम्मा छम्मा' या डान्ससाठी प्रेक्षकांनी पाहिला. या गाण्याची जादू एवढी होती की, आजही प्रेक्षक या गाण्याचे चाहते आहेत. आजही या डान्सच्या स्टेप जशास तशा कॉपी केल्या जातात.


उर्मिला मातोंडकर यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1974ला मुंबईमध्ये झाला. वयाच्या 42 व्या वर्षी उर्मिला यांनी 9 वर्षांनी लहान असलेल्या मॉडेल आणि व्यावसायिक मोहसिन मीर अख्तरशी लग्न केलं.