

सुप्रिया पाठक या बॉलिवूडमधील अशा हरहुन्नरी अभिनेत्री आहेत की त्यांच्यासमोर मात्तबर कलाकारही फिके पडतील. निवडक सिनेमे करणाऱ्या सुप्रिया यांना लोक आजही खिचडी मालिकेतील हंसा या व्यक्तिरेखेमुळे जास्त ओळखतात. सुप्रिया यांनी १९८१ मध्ये कलयुग सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. सुप्रिया यांना बॉलिवूडमध्ये जवळपास ४० वर्ष झाली. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्या थिएटर आर्टिस्ट होत्या. तसंच त्यांनी भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं आहे.


सुप्रिया यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर वयाच्या २२ व्या वर्षी त्यांच्या आईने मित्राच्या मुलाशी त्यांचे लग्न लाऊन दिलं होतं. मात्र हे लग्न एका वर्षात तुटलं. यानंतर १९८६ मध्ये त्यांची ओळख पंकज कपूर यांच्याशी झाली. तेव्हा पंकज कपूर यांचं पहिली पत्नी नीलिमा अजीमशी घटस्फोट झाला होता.


सुप्रिया यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला सुप्रिया आणि पंकज यांची कधीही विसरता न येणारी लव्हस्टोरी सांगणार आहोत. दोघांची पहिली भेट सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे सरळ नव्हती. दोघांना एकमेकांकडे पाहताच प्रेम वगैरेही काही झालं नाही. दोघंही आपआपल्या आयुष्यात कठीण प्रसंगातून जात होते.


१९८६ च्या काही वर्ष आधी जेव्हा सुप्रिया त्यांची पीएचडी पूर्ण करुन मुंबईतून अहमदाबादला राहायला गेल्या होत्या, तेव्हा त्यांची ओळख आई दिना पाठक यांच्या मित्राच्या मुलाशी झाली. दोघांमध्ये प्रेम झालं आणि दोघांनी लग्न केलं. तेव्हा त्यांचं वय फक्त २२ वर्ष होतं. लग्नाच्या एका आठवड्यानंतरच सुप्रिया यांच्या आयुष्यात वादळ यायला सुरुवात झाली.


एका आठवड्यातच लग्न करुन आपण सर्वात मोठी चूक केल्याचं त्या दोघांना कळून चुकलं होतं. मग सुप्रिया यांनी त्या लग्नात कसं बसं एक वर्ष काढलं. मग मात्र दोघांनी भांडण तंटा न करता एकमेकांना घटस्फोट दिला. त्यानंतर सुप्रिया मुंबईत परत आल्या.


१९८६ मध्ये २४ वर्षाच्या सुप्रिया भटिंडामध्ये एका सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा पंकज कपूर यांना भेटली. याआधी दोघं एकमेकांना फक्त कलाकार म्हणून ओळखत होता. दोघांनी एकत्र ‘अगला मौसम’ नावाचा सिनेमा केला. दोघांचं नशीब म्हणजे तो सिनेमा आजपर्यंत प्रदर्शितच झाला नाही. मात्र या दोघांना आयुष्यभराची सुंदर भेट देऊन गेला.


एकीकडे पंकज यांचं नऊ वर्षांचं लग्न तुटलं होतं. घटस्फोटानंतर त्यांचा तीन वर्षांचा मुलगा शाहिद आई नीलिमासोबतच राहत होता. घटस्फोटाच्या एक वर्षानंतर पंकज यांची ओळख सुप्रियाशी झाली. दोघांच्या जखमा ताज्या होत्या, त्यामुळे दोघं एकमेकांमध्ये प्रेम शोधत होते.


सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघंही जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवायचे. सगळं काही स्वप्नव्रत होतं. सुप्रिया यांना कळून चुकलं होतं की त्या पंकजशिवाय राहू शकत नाहीत. चित्रीकरण संपल्यानंतर पंकज आई- वडिलांना भेटण्यासाठी पंजाबला जात होते. सुप्रिया यांना गोष्ट अर्धवट सोडून परतायचे नव्हते. यामुळे सुप्रिया यांनी पंकजला घरुन परतल्यावर फोन करायला सांगितलं.


मुंबईत आल्यावर पंकज यांनी सुप्रियांना कॉल केला. हे नातं पुढे नेण्याची वेळ आली आहे हे दोघांनाही कळलं होतं. दोघांनी दोन वर्ष एकमेकांना डेट केलं आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुप्रिया दुसऱ्या लग्नासाठी पूर्णपणे तयार होत्या. मात्र पंकज यांच्या मनात काही वेगळंच होतं. घाईत लग्नाचा निर्णय घेऊ नये असं त्यांना वाटत होतं.


आयुष्यभरासाठी एकत्र येण्यापूर्वी त्यांना सुप्रियांना अजून जाणून घ्यायचे होते. दोघंही आपापल्या संस्कारांशी प्रामाणीक होते, त्यामुळे लिव्ह- इनमध्ये राहण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. दोघांनाही मुल हवं होतं तर लग्न हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर होता. शेवटी दोघांनीही आई- वडिलांकडे लग्नाविषय बोलण्याचे ठरवले. इथेही त्यांना सगळ्या गोष्टी सहज मिळाल्या नाहीत.


पंकजच्या घरातल्यांनी सुप्रियाला होकार दिला. मात्र सुप्रिया यांच्या आई दीना पाठक यांचा मात्र या नात्याला विरोध होता. त्यांनी शक्यतितक्या सर्व प्रकारे सुप्रिया यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण सुप्रिया यांनी आईची एकही गोष्ट ऐकली नाही. अखेर १९८९ मध्ये दोघांनी लग्न केलं. अखरे वेळेनुसार दिना पाठक आणि पंकज यांच्यातील नातंही सुधरत गेलं आणि त्यांनी पंकज यांचा स्वीकार केला.


तेव्हापासून पंकज आणि सुप्रियाचं नातं घट्ट झालं. दोघांमध्ये पहिल्या लग्नाबाबत चर्चाही झाली पण त्याचा नात्यावर काहीही परिणाम झाला नाही. सुप्रियाने एका मुलाखतीत पंकजबद्दलच्या अनेक गोष्टी उघड केल्या होत्या. सुखी संसारामागे समजुतदारपणा असल्याचं सुप्रिया मानते.


पंकज आणि सुप्रिया दोघेही वैवाहिक जीवनात संयम, विश्वास आणि जबाबदारीला महत्त्व देतात. काळानुसार जोडीदारात बदल होतात त्याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे. एका मुलाखतीत सुप्रियाने पंकजचे कौतुक करताना तो जगातील सर्वात चांगला माणूस असल्याचे म्हटले होते. तो प्रत्येक नातं, काम आणि वैयक्तिक आयुष्य यासाठी वेळ देतो.


आपल्याला वडीलांचं प्रेम मिळावं असं सुप्रियाला सतत वाटायचं. पंकजने वडिलांच्या प्रेमाची कमी कधी जाणवू दिली नाही. पंकजची तिनही मुलं तिच्यावर वडिलांचं सतत कौतुक करत असल्याची तक्रार करतात. सुप्रिया आणि पंकजची दोन मुलं सना कपूर आणि रुहान कपूर ही आहेत. सुप्रिया सावत्र मुलगा शाहिदला आपलाच मुलगा मानते.


शाहिद आणि सुप्रिया यांच्यातलं नातं शाहिदच्या लग्नावेळी सर्वांनाच बघायला मिळालं. शाहिदच्या लग्नात सुप्रियाने आईची जबाबदारी पार पाडण्यात काहीच कमी पडू दिलं नाही. सुप्रिया आणि पंकज यांची साधी, निरागस लवस्टोरी लक्षात राहणारी अशीच आहे. त्यांच लग्न हे याच गोष्टीचा पुरावा आहे की प्रेम पुन्हा होऊ शकतं तेही पहिल्या प्रेमाहून जास्त चांगलं.