

'जिवलगा' या मालिकेच्या सेटवर नुकतंच एक जंगी सेलिब्रेशन पार पडलं. निमित्त होतं ते सिद्धार्थ चांदेकरच्या आईच्या वाढदिवसाचं.


अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची आई सीमा चांदेकर मालिकेतही आई-मुलाच्या भूमिकेत आहेत. 'जिवलगा' या मालिकेच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि त्याची आई पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. सिद्धार्थसाठी ही खूप आनंददायी गोष्ट आहे, आणि म्हणूनच आईचा ५२ वा वाढदिवस यादगार करण्यासाठी त्याने 'जिवलगा'च्या सेटवर सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं.


सिद्धार्थ आणि जिवलगाच्या संपूर्ण टीमकडूम मिळालेलं हे खास सरप्राईज पाहून सिद्धार्थची आई भारावून गेली होती. आयुष्यातले काही क्षण न विसरता येणारे असतात. माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय वाढदिवस आहे. हे आनंदाचे क्षण मला दिल्याबद्दल सिद्धार्थ आणि जिवलगाच्या संपूर्ण टीमचे आभार अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


जिवलगा मालिकेतून स्वप्नील जोशी 7 वर्षांनी आणि सिद्धार्थ चांदेकर 9 वर्षांनी मालिकेत काम करतायत. सोबत अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे आहे.


स्वप्नील जोशी आपल्या या पुनरागमनाबद्दल बोलताना म्हणाला, मी ‘जिवलगा’मधील माझ्या भूमिकेबाबत खूपच उत्साही आहे. आज मी जो काही आहे तो टीव्हीमुळेच आहे. खूप वर्षांनंतर मी मालिका करतोय. मी आणि स्टार प्रवाहची संपूर्ण टीम ही मालिका आपल्यासमोर आणण्यासाठी उत्साही आहोत. यात विश्वास नावाच्या लेखकाची व्यक्तिरेखा मी साकारतोय. मागून काहीही मिळत नाही, ते कमवायला लागतं, यावर विश्वास ठेवणारा हा विश्वास आहे.


अमृता खानविलकर म्हणाली, ‘जिवलगा’मधील भूमिका माझ्या आयुष्याचा एक भाग होणार आहे. मी साकारत असलेली काव्या ही आजच्या काळात जगणारी मुलगी आहे. तिच्या आयुष्यात तिला साजेसा असा एक विश्वास नावाचा जोडीदारही आहे. काव्याचं आपल्या पतीसोबत असणारं नातं हे सर्वसामान्य नवरा-बायकोच्या नात्यापेक्षा खूप वेगळं आहे.