बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेले कलाकार आहेत. शत्रुघ्न यांनी सिनेमाप्रमाणे राजकारणातही नाव कमावलं. पण या सर्वांपेक्षा त्यांचं खासगी आयुष्य फार चर्चेत राहीलं. १९८० मध्ये शत्रुघ्न यांनी मिस इंडिया राहिलेल्या पूनम यांच्याशी लग्न केलं. पण त्यांचं नाव नेहमीच प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉय यांच्याशी जोडण्यात आलं.
याबद्दल सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या बायोग्राफी ‘एनिथिंग बट खामोश’मध्ये खुलासा करत म्हटले की, ‘१९८२ मध्ये जेव्हा मी रीनाला एका सिनेमासाठी विचारले होते. तेव्हा रीनाने मला सांगितले की, तुमच्या मित्राला जाऊन सांगा की मी त्याच्या उत्तराची वाट पाहत आहे. जर त्यांचं उत्तर हो आहे तरच मी त्याच्यासोबत काम करेन नाहीतर पुढच्या आठ दिवसांमध्ये लग्न करेन.’