

अनोखा अंदाज आणि सुंदर हास्यानं प्रेक्षकांची मनं जिंकणारे शशी कपूर एकेकाळी लाखो मुलींच्या हृदयावर राज्य करत होते. आज त्यांचा वाढदिवस. शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 रोजी कोलकाता मध्ये झाला होता.


लाखो मुली ज्याच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार होत्या असे शशी कपूर मात्र एका अशा मुलीच्या प्रेमात पडले होते ती बॉलिवूडची अभिनेत्रीही नव्हती आणि त्यांची चाहती देखील नव्हती. शशी कपूर आणि जेनिफर यांच्या रोमँटिक लव्ह स्टोरीचं गुपित जेनिफरची बहीण फेलिसिटी केंडलनं आपल्या व्हाइट कार्गो या पुस्तकात उघड केलं.


केंडलच्या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे शशी कपूर यांनी जेनिफरला पहिल्यांदा मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये पाहिलं होतं. तिथं एका कार्यक्रमाला जिनेफर आली होती. शशी कपूर यांनी स्टेजच्या मागून प्रेक्षकांकडे पाहिलं आणि पहिल्या नजरेत ते जेनिफर यांच्या प्रेमात पडले.ब्लॅक अँड व्हाइट पोल्का डॉटचा ड्रेस घातलेल्या विदेशी अभिनेत्री जेनिफर यांनी शशी कपूर यांना वेड लावलं होतं.


या अनोख्या लव्ह स्टोरीचा एक पैलू जेनिफर यांच्या वडिलांनीही उघड केला होता. 'शेक्सपीयर वाला' या ऑटोबायोग्राफीमध्ये जेफ्री केंडल यांनी सांगितलं की, शशी आणि जेनिफर यांची पहिली ओळख एका कनफ्यूजनमुळे झाली होती. कोलकाताच्या एंपायर हाऊसनं जेफ्री यांच्या 'शेक्सपीयराना' आणि शशी कपूर यांच्या 'पृथ्वी थिएटर्स' यांना परफॉर्मन्सला एकच तारीख दिली होती.


या गोंधळानंतर असं ठरलं की, दोन्ही ग्रुप एक दिवस सोडून एक दिवस असं परफॉर्म करतील ज्यामुळे दोघांनाही पुरेसा वेळ मिळेल. पहिल्या दिवशी बॅकस्टेजला झालेल्या ओळखी नंतर 18 वर्षांचे शशी कपूर 23 वर्षांच्या जेनिफर यांच्या प्रेमात पडले.


ही लव्ह स्टोरी सुरु झाल्यावर यात समस्या यायला सुरुवात झाली. 80च्या दशकातील सिनेमांच्या टिपिकल लव्ह स्टोरी प्रमाणे या दोघांच्याही प्रेमाचा प्रवास सोपा नव्हता. जेनिफर यांच्या वडिलांनी आपल्या नाटकाच्या ग्रुपमध्ये शशी कपूर यांना घेतलं होतं. मात्र ते जेनिफर आणि शशी यांच्या प्रेमाच्या विरोधात होते. शशी यांच्या इंग्रजी बोलण्याच्या पद्धतीवरुन जेफ्री अनेकदा त्यांची थट्टा करत आणि यामुळे अनेकदा जेफ्री आणि जेनिफर यांच्यात भांडण होत असे.


शशी आणि जेनिफर यांनी मिळून जेफ्री यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. बराच काळ प्रयत्न केल्यानंतर शशी आणि जेनिफर यांनी शेक्शपीयराना ग्रुप सोडला. विदेशातील त्यांचे शो रद्द होऊ लागल्यावर शशी कपूर यांनी मोठा भाऊ राज कपूर यांच्याकडे मदत मागितली.