

झगमगत्या दुनियेपासून दूर खऱ्या आयुष्यात कधी राजा कधी रंक ही म्हण अनेकदा खरी असल्याचं दिसून येतं. त्यातही सिनेसृष्टीत ही गोष्ट जास्त दिसून येते. सिनेसृष्टीत कोणत्याच गोष्टीची शाश्वती नसते.


दररोजचं आयुष्य जगणं हे बॉलिवूड सिनेमांमध्ये दाखवल्याप्रमाणे कधीच नसतं. ही गोष्ट सवी सिद्धू यांच्यावर लागू होते. एकेकाळी गुलाल, पटियाला हाऊस आणि ब्लॅक फ्रायडेसारख्या सिनेमांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेले सवी हे आज एका इमारतीचे सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतात.


सवी म्हणाले की, चंदिगढ इथून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. इथे त्यांनी काही वर्ष मॉडेलिंग केलं. यानंतर ते लखनऊमध्ये आले आणि कायद्याचं शिक्षण घेऊ लागले. सवी यांच्या म्हणण्यानुसार, कायद्याचं शिक्षण घेत असताना ते थिएटरमध्ये काम करत होते. यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपने त्यांना पांच या सिनेमासाठी साइन केलं. हा सिनेमा कधीच प्रदर्शित झाला नाही.


यानंतर सवी यांनी अनुराग कश्यपच्या ब्लॅक फ्रायडे सिनेमात पोलीस आयुक्तांची व्यक्तिरेखा साकारली. सवी यांनी अनुरागच्याच गुलाल सिनेमातही काम केलं. त्यांनी यशराज फिल्मसाठीही काम केल्याचं सावी म्हणाले.


सवी यांच्या आजारपणानंतर आयुष्य बदलायला लागलं. ‘माझ्यासाठी सर्वात वाईट काळ तेव्हा होता जेव्हा माझ्या पत्नीचं निधन झालं. यादरम्यान, माझे आई, वडील आणि अन्य नातेवाईकांचा मृत्यू झाला. हळूहळू मी एकटा पडू लागलो. नंतर मी एकटा राहू लागलो. यानंतर मी सिक्युरिटी गार्डची नोकरी पकडली. सिनेनिर्माते- दिग्दर्शकांना भेटायला जाण्यासाठी माझ्याकडे बसने फिरण्याचेही पैसे नव्हते.’