

बॉलिवूडमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर इथं तुमचा कोणीतरी गॉडफादर असणं किंवा तुम्ही स्टार किड्स असणं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं. पण बॉलिवूडमधील काही कलाकार मात्र याला अपवाद ठरले. बॉलिवूमध्ये कोणीही गॉडफादर नसताना किंवा अभिनयाची कोणतीही कौटुंबीक पार्श्वभूमी नसताना या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि अनेक सुपरहिट सिनेमे दिले.


अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे सध्या फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही यशस्वी ठरलेलं नावं आहे. 2000मध्ये 'मिस वर्ल्ड'चा मुकूट जिंकल्यावर अभिनय क्षेत्राकडे वळलेली प्रियांका त्याआधी मॉडेलिंग क्षेत्रातील आघाडीची मॉडेल होती. 2003मध्ये तिनं 'अंदाज' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात ती अक्षय कुमार सोबत दिसली. अभिनय क्षेत्रात पाऊल टाकल्यावर मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करत तिनं बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली.


बॉलिवूडमध्ये येण्याआधी अभिनेत्री दीपिका पदुकोणनं मॉडेल म्हणून काम केलं होतं. किंग फिशर कॅलेंडरचा मॉडेल ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकल्यावर दीपिकाला बॉलिवूडमधून ऑफर येण्यास सुरुवात झाली आणि 2007मध्ये तिनं शाहरुख खान सोबत 'ओम शांति ओम' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं. आज ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.


1994मध्ये ऐश्वर्या रायनं मिस वर्ल्डचा मुकुट जिंकल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज ती बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनयाची कोणतीही कौटुंबीक पार्श्वभूमी नसलेल्या ऐश्वर्यानं 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'गुरु' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.


सुरुवातीला मॉडेलिंगमध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या अनुष्का शर्मानं 'बँड बाजा बारात' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2017मध्ये अनुष्कानं क्रिकेटर विराट कोहलीशी लग्न केलं. आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये अनुष्काचं नाव घेतलं जातं.


सलमानला कतरिना कैफचा गॉडफादर म्हटलं जात असलं तरीही तिला अभिनयाची कोणतीही कौटुंबीक पार्श्वभूमी नाही. एक ब्रिटीश मॉडेल म्हणून भारतात आलेल्या कतरिनाला बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या काळात बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं. पण तरीही या सर्वांवर मात करत तिने बॉलिवूडमध्ये आपले पाय घट्ट रोवले आहेत.


'स्टू़डंट ऑफ द इयर' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्रानं वयाच्या 18व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसणाऱ्या सिद्धार्थनं आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमधील आपलं स्थान पक्कं केलं. आज तो बॉलिवूडमधला एक लोकप्रिय अभिनेता आहे.