

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 ला बलुचिस्तानमध्ये ताब्यात घेतलं, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानने त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.


दरम्यान, भारताने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती आणली. 17 जुलै रोजी न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निर्णय पाकिस्तानला दणका दिला.


या निर्णयानंतर जाधव यांना काउन्सिलर अॅक्सेस (councillor access) देण्यात येणार आहे. ज्याद्वारे त्यांच्यासोबत राजनैतिक संपर्क करता येणार असल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली.


भारताच्या बाजूने आलेला निकाल पाहून पाकिस्तानचे नागरिक चांगलेच चिडले आहेत. नुकतंच पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने या प्रकरणी एक वादग्रस्त ट्वीट केलं आहे.


या प्रकरणी आपली नाराजी व्यक्त करत तिने जाधव यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं आहे. तिच्या या विधानामुळे ती सोशल मीडियावर ट्रोलही होत आहे.


वीणाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून लिहिले की, ‘दहशतवादी आणि हत्यारे कुलभूषण जाधव यांना कोणतीही दया दाखवता कामा नये. जे तुम्ही पेरता तेच उगवतं. भारताच्या गुप्तहेरांना आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी वाघा बॉर्डरवर कुलभूषण जाधव यांना फाशी देण्यात यावी.’


वीणाचं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिला ट्रोलही केलं जात आहे. काहींनी तिला बिग बॉसमधील तिच्या वादग्रस्त दिवसांची आठवण करून दिली. तर काहींनी पाकिस्तानमधील ‘पनौती’ असा तिचा उल्लेख केला. अनेकांनी ट्विटरवरच वीणाची शाळा घेतली.


पाकिस्तानची अवस्था किती बेकार आहे यावरही अनेकांनी मीम्स तयार केले. या सर्व कमेंट वाचून वीणाला असं ट्वीट करणं नक्कीच भारी पडलं असं म्हणायला हरकत नाही. ट्रोल झाल्यानंतर वीणाची अजून प्रतिक्रिया आलेली नाही.