

हिंदी सिनेमा आणि संगीत क्षेत्रात ओपी नय्यर यांचं फार मोठं नाव आहे. नय्यर यांचा जन्म पाकिस्तानातील लाहोर येथे १६ जानेवारी १९२६ मध्ये झाला. ओपी नय्यर यांना संगीत क्षेत्रातील बादशहा म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यांच्या संगीताने बॉलिवूड संगीताला एक वेगळेच स्थान मिळवून दिले. आजही त्यांच्या संगीताचे लाखो चाहते आहेत.


ओपी नय्यर यांनी १९५२ मध्ये 'आसमान' या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती गुरु दत्त यांच्या 'आरपार', 'मिस्टर अँड मिसेस ५५', 'सी आय डी' आणि 'तुम सा नहीं देखा' या सिनेमातून. यानंतर त्यांनी अनेक सिनेमांना संगीत दिलं आणि एक मोठे संगीतकार म्हणून ओळखले जाऊ लागले.


असं म्हटलं जातं की, ओपी नय्यर यांची जोडी हिंदीच्या प्रसिद्ध गायिका शमशाद बेगम यांच्यासोबत चांगली जमली होती. दोघांनी 'कभी आर कभी पार', 'ले के पहला पहला प्यार', 'कजरा मोहब्बत वाला' आणि 'कहीं पे निगाहें कही पे निशाना' अशी एकाहून एक सरस गाणी एकत्र गायली. आजही लोक या गाण्यासाठी वेडे आहेत.


आश्चर्य म्हणजे ओपी नय्यर यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये लता मंगेशकर यांच्याकडून एकही गाणं गाऊन घेतलं नाही. नय्यर यांच्यामते, लता यांचा आवाज त्यांच्या संगीताशी मेळ खात नव्हता. एकीकडे छोट्या संगीतकारापासून ते मोठ्या निर्मात्यांपर्यंत साऱ्यांनाच लता मंगेशकरांचं गाणं आपल्या सिनेमात असावं असं वाटत होतं. मात्र ओपी नय्यर हे एक असे संगीतकार होते ज्यांना लता दिदिंनी आपलं गाणं गावं असं कधीच वाटलं नाही.