मराठी चित्रपट म्हणलं की प्रमोशनच्या नावाने कायमच होणारी बॉम्ब प्रेक्षकांना आत्तापर्यंत माहित होती. आपल्या मराठीमध्ये चित्रपटांची किंवा टॅलेंटची नव्हे तर कायमच प्रमोशनची कमतरता राहिली आहे. मात्र आत्ता हे चित्र बदलताना दिसत आहे. मागच्या एक-दोन वर्षात चित्रपट बनवताना त्याच्या प्रमोशनल स्ट्रॅटेजिवर बरंच काम होताना दिसत आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ या सगळ्या प्रमोशन स्ट्रॅटेजीमध्ये नंबर वन वर आहे असं म्हणता येईल. या चित्रपटाने सोशल मीडियावर ट्रेंडिंग गाण्याच्या रील्ससह मोठा धुमाकूळ घातला. चित्रपटाचं पोस्टर अगदी रिक्षा, बस, थेट विमानावर सुद्धा झळकवत गगनात झेप घेतली. पुणे मेट्रोमध्ये सुद्धा अमृताने खास डान्स तिच्या फॅन्ससमवेत सादर केला. अगदी छोट्यात छोट्या गावांपासून प्रेक्षकांना जोडण्याचं काम या चित्रपटाच्या प्रमोशनने केलं. या चित्रपटाचं प्रमोशन बॉलिवूडच्या अभिनेत्यांनी सुद्धा केलं.
फर्जंद, फत्तेशिकस्त, आणि पावनखिंड चित्रपटाच्या यशानंतर शिवराज अष्टकातील पुढच्या चित्रपटासाठी दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी अनोख्या पद्धतीने प्रमोशन करायचं ठरवलं. या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रतापगडाच्या सफरीवर गेलायचं पाहायला मिळालं. त्या गडावर ढोल ताशे वाजवण्यापासून ते पारंपरिक पद्धतीने काकडा नाचवण्यापर्यंत शिवकालीन संस्कृतीतील अनेक गोष्ट्टीचा अनुभव घ्यायला मिळाला.