

लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुकलं गेलं आहे. राजकारण आणि बॉलिवूड यांचं नातं तसं फार जूनं आहे. प्रत्येक निवडणुकीत एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री राजकारणात प्रवेश घेतात. सुरुवात करुया बॉलिवूडचे ‘बाबूमोशाय’ राजेश खन्ना यांच्यापासून. १९९१ मध्ये राजेश यांनी काँग्रेसकडून उभं राहत नवी दिल्ली येथून निवडणूक लढवली होती.


भाजपचे लालकृष्ण आडवाणी यांच्याविरोधात राजेश खन्ना उभे राहिले होते. या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली. पण अवघ्या दीड हजार मतांनी राजेश खन्ना यांचा पराभव झाला. यानंतर १९९२ मध्ये पोटनिवडणूकांमध्ये याच जागेवरून राजेश यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना हरवलं होतं. पण राजकारणात त्यांचं मन फारसं रमलं नाही. १९९६ मध्ये त्यांनी सक्रीय राजकारणातून काढता पाय घेतला.


महानायक अमिताभ बच्चन यांनीही राजकारणात आपला करिश्मा चालतो का हे तपासून पाहिलं. माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी अमिताभ यांना राजकारणात आणलं. अमिताभ यांनी १९८४ मध्ये अलाहाबाद (आताचं प्रयागराज) मधून निवडणूक लढले होते. त्यांनी या सीटवरून दिग्गज नेते हेमवंती नंदन बहुगुणा यांना हरवले होते. मात्र बोफोर्स घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांना खासदार पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ते कधीच राजकारणात सक्रीय झाले नाहीत.


सुनील दत्त बॉलिवूडप्रमाणे राजकीय जगतातही हिट राहिले. त्यांनी १९८४ मध्ये पहिली निवडणूक लढवली. वकील राम जेठमलानी यांचा सुनील यांनी पराभव केला होता. ते एक किंवा दोनदा नाही तर तब्बल पाचवेळा खासदार म्हणून निवडणून आले होते.


डान्सिंगचा बादशहा अशी ओळख असलेल्या गोविंदाही राजकारणात काही काळ सक्रीय होता. त्याने २००४ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्याने भाजपचे राम नाईक यांना ५० हजार मतांनी हरवले होते. मक्ष २००८ मध्ये त्याने पक्षाला राजीनामा दिला.


शत्रुघ्न सिन्हा अनेक वर्षांपासून भाजपशी जोडले गेले आहेत. पण आता त्यांनी काँग्रेस पक्षात जाणं योग्य समजलं. १९८४ मध्ये त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता. १९९६ मध्ये शत्रुघ्न यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली. तर २००२ मध्ये दुसऱ्यांदा ते खासदार म्हणून निवडणून आले. २००३ आणि २००४ मध्ये ते स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्री होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून पक्षातल्या मतभेदांमुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. यंदा ते काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत.


हेमा मालिनी यांनी २०१४ मध्ये भाजपकडून निवडणूक लढवली आणि मथुरा येथून त्या जिंकूनही आल्या. यावर्षीही त्या मथुरा येथूनच उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली.


जया प्रदा या पहिल्यांदा समाजवादी पक्षात होत्या. मात्र आता त्यांनी भाजपमध्ये समावेश केला. रामपुर येथून त्या निवडणूक लढवणार आहेत. सपामध्ये असताना जया यांनी उथूनच निवडणूक जिंकली होती. २००४ ते २००९ मध्ये त्या खासदारही होत्या. मात्र २०१४ मध्ये त्यांनी आरएलडीच्या तिकीटावर बिजनौरकडून निवडणूक लढवली होती. यात त्यांचा दारुण पराभव झाला.