HBD Zakir Hussain: तबल्याचे जादूगार; वयाच्या 11व्या वर्षी अमेरिकेत केला होता पहिला शो
आलम दुनियेत तबलावादकांचा विषय निघाला तर एक नाव घेतल्याशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही आणि ते आहे उत्साद झाकीर हुसेन (Ustad Zakir Hussain). झाकीर यांचं मत असं आहे की, हिंदुस्थानी शास्रीय संगीत हे स्टेडियममध्ये मोठ्या जनसमुदायासमोर सादर करण्यासाठी नसून ते बंद खोल्यांमध्ये सादर केलं जातं आणि त्याचे चाहते मनसोक्त आनंदही लुटतात.


आपल्या बोटांमधल्या जादूने तबल्यातील स्वरांची एक दुनिया निर्माण करणारे जादुगार उस्ताद झाकीर हुसेन यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 9 मार्च 1951 ला झाला. त्या काळातील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांचे पुत्र झाकीर यांना तबल्याची कला वारसा स्वरूपात मिळाली. ती त्यांनी जपून कलेला मोठं नाव मिळवून दिलं.


जगभर उस्ताद या नावाने सुप्रसिद्ध असणाऱ्या, मुंबईत जन्मलेल्या झाकीर यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण घेतलं. वयाच्या 11व्या वर्षी छोट्या झाकीरने अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट सादर केला. या सादरीकरणानंतर झाकीर यांनी स्वत:चं स्थान निर्माण करायला सुरुवात केली आणि 1973 मध्ये त्यांचा पहिला म्युझिक अल्बमही (Music Album) लाँच झाला. लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड नावाच्या या अल्बमला चांगली लोकप्रियता मिळाली. त्यानंतर वडिलांपेक्षा वेगळी स्वत:ची अशी प्रतिमा निर्माण करायला सुरुवात केली.


आपल्या तबला वादनामुळे उस्ताद झाकीर यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीताचा ग्रॅमी पुरस्कारही मिळाला आहे आणि तोही एकदा नव्हे तर दोनदा. प्रचंड लोकप्रियता आणि कौतुक पदरी पडल्यानंतरही झाकीर यांनी स्वत: ला कधीच सर्वोत्तम वादक (Best Tabla player) मानलं नाही. ते कायमच मुलाखतींमध्ये सांगतात की, त्यांच्याही पेक्षा उत्तम वादन करणारे अनेक तबलावादक संगीतक्षेत्रात आहेत. संपूर्ण जग जरी त्यांना उस्ताद म्हणत असलं तरीही ते स्वत:ला परिपूर्ण मानत नाही आणि सतत गाण्यातलं काही नवं शिकत राहतात. एका सोहळ्यात रसिकांनी दिलेली दाद स्वीकारताना झाकीर या फोटोत दिसत आहेत.


झाकीर 12 वर्षांचे असताना वडिल अल्लारखांसोबत एका संगीत कार्यक्रमाला गेले होते. त्या कार्यक्रमात पंडित रविशंकर, उस्ताद अली अकबर खान, बिस्मिल्लाह खान, पंडित शांता प्रसाद आणि पंडित किशन महाराज यांसारखे भारतीय शास्रीय संगीतातील दिग्गज व्यासपीठावर होते. त्यावेळी संयोजकांनी अल्लारखांचा मुलगा म्हणून झाकीर यांना व्यासपीठावर तबला सादरीकरणाला (Tabla Presentation) बोलवलं. त्या सादरीकरणानंतर झाकीर यांना 5 रुपये मिळाले होते ते पाच रुपये हे माझ्यासाठी सर्वांत अमूल्य बक्षीस होतं असं झाकीर सांगतात.


1992 मध्ये द प्लेनेट ड्रम आणि 2009 मध्ये ग्लोबल ड्रम प्रोजेक्टसाठी त्यांना 2 ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) मिळाले. त्याचबरोबर पद्मश्री, पद्मभूषण आणि संगीत नाटक अकादमीच्या वतीनेही उस्ताद झाकीर हुसेन यांचा गौरव करण्यात आला आहे. झाकीर यांचं मत असं आहे की, हिंदुस्थानी शास्रीय संगीत हे स्टेडियममध्ये मोठ्या जनसमुदायासमोर सादर करण्यासाठी नसून ते बंद खोल्यांमध्ये सादर केलं जातं आणि त्याचे चाहते मनसोक्त आनंदही लुटतात.