त्यांनी पुढे लिहलंय, 'चिमणीला सुद्धा स्वत:च्या मनाप्रमाणं चिवचिवण्याची मुभा आहे... आपण तर माणूस आहोत. आपल्याला असं व्यक्त होण्याचं, मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य का मिळू नये??? एखाद्यानं काय बोलायचं... कसं वागायचं... स्वत:च्या घरात काय खायचं... कसले कपडे घालायचे... यावर बंधनं आणण्याचे प्रकार सुरू आहेतच... पण आता कळस झालाय.
गौतमी, जेव्हा तू चुकली होतीस, तुझ्या व्हल्गर हातवार्यांवर गदारोळ उठला होता, तेव्हा तू माफी मागीतली होतीस... पुन्हा ती चूक होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतलीस. खरंतर त्यानंतरच तू लोकप्रियतेच्या पायर्या चढू लागलीस. आज तू जे करतेस त्यात आता 'बिभत्स' असं काहीही नाही. परफाॅर्मन्स करताना अंगभर कपडे असतात. तू ज्या अदाकार्या करतेस त्यावर ग्रामीण भागातली तरूण पोरं जीव ओवाळून टाकतात..
तुझ्या क्षेत्रात अशी लोकप्रियता लाखात एखादीला लाभते. तुझा डान्स हा उच्च दर्जाचा आहे की नाही, याविषयी प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं आणि त्या प्रत्येक मताचा आदर आहे... पण तरीही कुणीही हे नाकारू शकत नाही,की आजच्या तरूणाईमध्ये तुझी जबरदस्स्त 'क्रेझ' आहे.. तुझ्या स्टेजवरच्या फक्त एंट्रीनं तरूणाई पागल होते.. गांवखेड्यांत तू लोकप्रियतेचा कळस गाठला आहेस.
तिथे मराठी सिनेमा-सिरीयलमधल्या टाॅपच्या अभिनेत्रींपेक्षा तू पाॅप्यूलर आहेस. तू हे यश एंजाॅय कर. बर्याचदा अशा यशाचा काळ छोटा असतो. जोवर आहे तोवर धमाल कर. तुझ्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर याहूनही मोठे यश मिळवशील पुढे जाऊन. पण 'आम्हाला वाटतंय तसंच तू वागावंस, तस्संच नाचावंस आणि आम्ही सांगतोय तेच नांव लावायचंस' असं दरडावू पहाणार्यांना उंच उंच लांब उडवून लाव.आज तरी तू आमच्या ग्रामीण भागातल्या मनोरंजनक्षेत्रातली 'पाटलीण' हायेस... रुबाबात नाच, बिनधास्त नाच !