बॉलिवूडमध्ये एका काळात #MeToo ही चळवळ सुरु झाली होती. मीटूचं वादळ बॉलिवूडमध्ये आणणारी अभिनेत्री म्हणून तनुश्री दत्ताकडे (Tanushree Dutta) पाहिलं जातं. या अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यावर अनेक आरोप केले होते. तीच तनुश्री दत्ता बॉलिवूडमध्ये (Bollywood Comeback) करणार आहे. सोशल मीडियावर तिने तशी पोस्ट केली आहे. विशेष म्हणजे तनुश्रीने 15 किलो वजनही कमी केलं आहे.
तनुश्रीने इन्स्टाग्रामवर एक भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहीलं आहे, ’मी एलएमध्ये आयटीमध्ये नोकरी करत आहे. अशा अफवा माझ्याबद्दल पसरवल्या जात आहेत. खरंतर मी तसंच शिक्षण घेतलं आहे. मला यूएस सरकारच्या डिफेंन्स सेक्टरमध्ये नोकरीची संधीही आली होती. पण ही नोकरी मी स्वीकारली नाही. मी मनाने कलाकार आहे.’
तनुश्री दत्ता पुढे लिहीते, ‘माझं करिअर बदलण्याची मी घाई करणार नाही. पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. मी केलेल्या वेब सीरिज आणि सिनेमांमुळे इंडस्ट्रीमध्ये मला चांगलं नाव मिळालं आहे. काही लोकांमुळे मी माझं करिअर खराब करणार नाही. बॉलिवूडमध्ये परत येऊन मी काही नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे. ’
अभिनेत्रीने स्वत:च्या नव्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली. तनुश्री म्हणते, ‘दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेल्या 3 मॅनेजर्सच्या संपर्कात आहे. तसंच मुंबईतील कास्टिंग करणाऱ्या 13 ऑफिसेसच्या संपर्कामध्येही आहे. इंटस्ट्रीमधील काही लोकं मला गुपचूप पाठिंबा देत आहेत. काही मोठ्या प्रोडक्शन हाऊसशी मुख्य भूमिकांसाठी माझी बातचीत सुरू आहे.’